पुणे : इंग्रजांविरोधात लढताना प्राणांची आहुती देणारे शहीद राजगुरु हे राष्ट्रीय स्वयंसेवक संघाचे नव्हे तर देशाचे आहेत, असे राजगुरुंच्या वंशजांनी म्हटले आहे.  राजगुरु यांचे थोरले बंधू दिनकर राजगुरु यांचे नातू सत्यशील आणि हर्षवर्धन यांनी एबीपी माझाशी बातचित केली.

इंग्रजांविरोधातील लढ्यात राजगुरु यांनी आपले प्राण गमावले. त्यामुळे त्यांना कोणत्याही उजव्या वा डाव्या विचारसरणीशी न जोडता केवळ एक क्रांतिकारी म्हणूनच पहावे, असंही त्यांनी म्हटलं.

राजगुरुंचे वंशज नेमकं काय म्हणाले?

“हुतात्मा राजगुरु हे राष्ट्रीय स्वयंसेवक संघाचे स्वयंसेवक होते आणि संघ शाखेवर जात होते, याबाबत आमचे आजोबा आणि वडिलांनी आम्हाला कधीच काही सांगितलं नाही. हुतात्मा राजगुरु यांच्याबद्दल अनेक पुस्तकं आणि साहित्य प्रसिद्ध आहे. मात्र त्यामध्ये राजगुरु हे संघ स्वयंसेवक होते, याबाबत कोणताही उल्लेख नाही.”, असे राजगुरुंच्या वंशजांनी एबीपी माझाशी बोलताना सांगितले.

“हुतात्मा राजगुरु लाहोरहून पुण्याला परत येताना नागपूरला थांबले होते. काही स्वयंसेवक त्यांचे मित्रही होते. हेडगेवारांनाही ते भेटले होते. मात्र याचा अर्थ असा होत नाही की ते संघ स्वयंसेवक होते.”, असेही ते पुढे म्हणाले.

तसेच, “हौतात्म्याच्या 87 वर्षांनंतर यांना राजगुरुंची आठवण का आलीय? भगतसिंग, राजगुरु आणि सुखदेव यांना कोणत्याही पक्ष किंवा संघटनेशी जोडलं जाऊ नये. ते संपूर्ण देशाचे होते.”, असे आवाहनही राजगुरुंच्या वंशजांनी केले.

राष्ट्रीय स्वयंसेवक संघाचे माजी प्रचारक नरेंद्र सहगल यांनी लिहिलेल्या पुस्तकात राजगुरु हे संघाचे स्वयंसेवक असल्याचा दावा करण्यात आला आहे. इतकंच नाही, तर हेडगेवार यांच्याशीही त्यांचे चांगले संबंध असल्याचं नमूद करण्यात आलं आहे.

पुस्तकात काय दावे करण्यात आले आहेत?

- राजगुरु हे संघ संस्थापक डॉक्टर केशव बळीराम हेडगेवार यांचे निकटवर्तीय होते.

- राजगुरु हे नागपूरच्या मोहिते वाड्याच्या शाखेचे स्वयंसेवक होते.

- इंग्रज पोलीस अधिकारी सँडर्सला गोळ्या घातल्यावर ते लाहोर सोडून पळाले.

- नागपुरात येऊन राजगुरु डॉक्टर हेडगेवारांना भेटले.

- डॉक्टर हेडगेवारांनी त्यांची राहण्या-खाण्याची सोय भैय्याजी दनः यांच्या घरात केली.