रत्नागिरी:  कोकणात सध्या मोठ्या राजकीय घडामोडी घडत आहेत. नारायण राणे यांनी नुकतीच काँग्रेसला सोडचिट्ठी दिली. त्यानंतर आता शिवसेनेचे आमदार उदय सामंत यांचे अत्यंत निष्ठावंत राजेश सावंत यांनी शिवसेनेला जय महाराष्ट्र केला आहे. रत्नागिरी शहराचे उपनगराध्यक्ष राजेश सावंत यांची आमदार उदय सामंत यांच्या राजकीय प्रवासातील अत्यंत निष्ठावंत आणि जवळची व्यक्ती अशी ओळख आहे. राजेश सावंत यांनी शिवसेना आणि उदय सामंत यांच्याशी घेतलेली फारकत सगळ्यांच्याच भुवया उंचावणारी आहे. “माझ्याविरोधात गेल्या काही काळात, काही लोकांनी अविश्वासाचे वातावरण निर्माण केले. हे जाणीवपूर्वक होत असल्याचे लक्षात आल्यानेच मला शिवसेना सोडावी लागत आहे”, असं राजेश सावंत म्हणाले. राजेश सावंत यांनी शिवसेना आणि उदय सामंत यांची साथ सोडल्याने, कोकणात नव्या राजकीय घडामोडी घडताना दिसत आहेत.