राज्यातली शहरं बळकावली जात आहेत आणि आपआपल्या जाती, धर्माचे मतदारसंघ बळकट केले जात आहेत. पण महाराष्ट्रातली जनता सध्या बेसावध असल्याची भूमिका राज ठाकरेंनी मांडली.
कोरेगाव-भीमा हिंसाचाराचा उल्लेख करत राज ठाकरे म्हणाले की, “महाराष्ट्रात जे घडत आहेत, त्यावर लिहिण्याचे धाडस लेखक करत नाहीत. जातीपातीच्या राजकारणामुळे राज्यातली सामाजिक घडी विस्कटली आहे. त्यामुळे या सगळ्या जातीय भिंती पाडा, आणि महाराष्ट्रवर जी संकटे येत आहेत, त्याला सामोरे जाण्यास तयार राहा" अशी सूचनाही राज ठाकरेंनी यावेळी दिली.
विशेष म्हणजे, कमला मिल्स अग्नितांडव प्रकरणावरुनही राज ठाकरेंनी पंतप्रधान नरेंद्र मोदींवर निशाणा साधला.
“कमला मिल्स अग्नितांडवात मृत्युमुखी पडलेले फक्त गुजराती समाजाचे होते. त्यामुळे पंतप्रधानांनी त्यांच्यासाठी ट्वीट करुन शोक व्यक्त केला. वास्तविक, पंतप्रधान आता फक्त गुजरातचे नाहीत हे त्यांनी ध्यानात घ्यावं,” असा खोचक टोला राज ठाकरेंनी हाणला.
भाजप सरकारच्या कारभाराचाही राज ठाकरेंनी यावेळी चांगलाच समाचार घेतला. “राज्यात शेतकरी आत्महत्यावर कुणी काही बोलत नाही. महाराष्ट्र नोकऱ्या आहेत, पण त्याही परप्रांतीय नोकऱ्या घेऊन जात आहेत. केंद्रीय मंत्री नितीन गडकरींनीही मुंबई-बडोदा रस्त्यासाठी काही कोटी रुपये देण्याचं जाहीर केलं. पण त्यांना महाराष्ट्र दिसला नाही.” असं राज ठाकरे म्हणाले.
दरम्यान, राज ठाकरेंनी आपल्या सांगली दौऱ्यात पोलीस मारहाणीत मृत्यू झालेल्या अनिकेत कोथळेच्या कुटुंबियांची भेट घेऊन, त्यांचं सांत्वन केलं. यावेळी प्रकरण दडपण्याचा प्रयत्न करणाऱ्या पोलीस उपाधिक्षक दीपाली काळे यांच्यावर कारवाईसाठी या प्रकरणात लक्ष घालण्याची मागणी कोथळे कुटुंबियांनी राज ठाकरेंकडे केली.