सदाभाऊ खोत हे पक्षातून गेल्यानंतर स्वाभिमानीला हवा असलेला गावरान चेहरा आपणच असल्याचे तुपकरांनी या मेळाव्यात दाखवून देत, शब्दा-शब्दाला उपस्थितांची हशा आणि टाळ्या मिळविल्या.
“भाजपला सत्तराव्या वर्षी लेकरु झालाय, तेही आमच्यामुळे. त्यामुळे त्याचा थाट वेगळा असणारच. लगीन जमवताना कै गोपीनाथराव मुंडे आणि श्री श्री रविशंकर यांच्या उपस्थितीत मोदींनी भरभरुन आश्वासने दिली. पण काहीच झाले नाही. पण आमच्याशी लगीन करून आम्हालाच हात लावू देत नव्हती ही कमलाबाई. सुरुवातीला वाटतेय लाजतीय, पण नंतर तिचे रंग समजू लागल्यावर आम्ही घटस्फोट घेतला. आता हिचे लगीन शिवसेनेसोबत आहे आणि लफडं नारायण राणे सोबत सुरु आहे.”, अशा शब्दात तुपकर यांनी केंद्र आणि राज्यातील भाजप सरकारला लक्ष केले.
यानंतर बोलताना खासदार राजू शेट्टी यांनी साखरेच्या पडलेल्या भावाबाबत केंद्र सरकारला जबाबदार धरत, जबाबदार असणाऱ्यांची चौकशी करून तातडीने कारवाई करण्याची मागणी केली.
“वास्तविक यावर्षी गरजे एवढेच साखरेचे उत्पादन झाले असून गेल्यावर्षीच साठा देखील शिल्लक नसताना साखरेचे दार पडण्यामागे काही बडे व्यापारी आणि साखर कारखानदार आहेत.”, असा शेट्टी यांनी आरोप केला.
गेल्या काही दिवसात जादा साखर खरेदी केलेले व्यापारी आणि जादा साखर विकलेल्या कारखानदारांची चौकशी केल्यास हा घोटाळा उघड होईल, असेही शेट्टी म्हणाले. त्याचवेळी, फायद्यात 70-30 च्या नियमानुसार शेतकऱ्यांना फायदा द्यावा लागू नये यासाठी कारखानदार असले उद्योग करीत असतील तर त्यांच्या नरडीवर पाय देऊन शेतकऱ्यांचा हिस्सा मिळवू, असा इशाराही यावेळी राजू शेट्टी यांनी दिला.