नागपूर : डॉक्टर बनण्याचं स्वप्न उराशी बाळगून मराठवाड्यातून नागपुरात शिक्षण घेण्यासाठी आलेल्या विष्णू पवार नावाच्या विद्यार्थ्याने शासकीय आदिवासी मुलांच्या वसतीगृहात त्याच्यासोबत रॅगिंगचा अमानवी प्रकार घडल्याचा गंभीर आरोप केला आहे. वसतीगृहातील सिनिअर विद्यार्थ्यांनी विष्णूला अज्ञात विषारी द्रव्य पाजल्याचा आरोप पीडित पवार कुटुंबाने केला. सध्या अत्यवस्थ असलेल्या विष्णूवर खाजगी रुग्णालयात उपचार सुरु आहेत.


परभणी जिल्ह्यातील ग्रामीण भागातून उपराजधानीत आयुर्वेदिक डॉक्‍टर बनण्यासाठी आलेला विष्णू पवार सध्या स्वतः नागपूरच्या क्रिटी केयर रुग्णालयात उपचार घेत आहे. कारण, तो राहत असलेल्या शासकीय आदिवासी वसतीगृहात रॅगिंग करताना सिनिअर मुलांनी त्याच्यासोबत शारीरिक आणि मानसिक छळ केल्याचा आरोप आहे. गेल्या अनेक दिवसांपासून हा प्रकार सुरु होता. मात्र, 21 फेब्रुवारीच्या रात्री वसतीगृहातील काही सिनिअर विद्यार्थ्यांनी त्याला 205 क्रमांकाच्या खोलीत बोलावून जबर मारहाण केली, असा आरोप विष्णूने केला.

जबरदस्तीने विषारी द्रव्य पाजलं?

मुलगा अत्यावस्थ असल्याची माहिती मिळाल्यानंतर विष्णूचे आई-वडीलही नागपुरात पोहोचले आहेत. आईसोबत बोलताना विष्णूने त्याच्यासोबत वसतीगृहात अनेक अमानवी प्रकार घडल्याची माहिती दिल्याचा दावा कुटुंबीयांनी केला. कुटुंबीयांच्या मते, काही सिनिअर विद्यार्थी विष्णूच्या अंगावर घाण द्रव्य (मूत्र) फेकायचे. तर घटनेच्या रात्री काही विद्यार्थ्यांनी विष्णूला बळजबरीने काही द्रव्य पाजलं त्यामुळेच त्याची स्थिती बिघडल्याचा दावा त्यांनी केला.

सिनियर विद्यार्थ्यांनी आरोप फेटाळले

दरम्यान, एबीपी माझाने संबंधित शासकीय आदिवासी वसतीगृहात जाऊन माहिती घेतली. तिथल्या विद्यार्थ्यांनी विष्णूचे सर्व आरोप फेटाळून लावले आहेत. त्यांच्या मते, गेल्या 4 महिन्यांपासून विष्णू वसतीगृहात राहत होता. मात्र, तो नेहमीच एकटा राहायचा आणि इतर विद्यार्थ्यांमध्ये मिसळत नव्हता. घटनेच्या दिवशी रॅगिंगचा प्रकार घडला नसून विष्णूने स्वतः काहीतरी विषारी द्रव्य प्राशन केल्याचा आरोप विद्यार्थ्यांनी केला. उलट आम्ही त्याला उचलून रुग्णालयात दाखल केल्याचा दावा त्यांनी केला आहे.

वसतीगृहातील वार्डननेही विष्णूचे सर्व आरोप फेटाळले आहेत. वसतीगृहात रॅगिंगचे कोणतेही प्रकार घडले नाही, असा दावा त्यांनी केला आहे.

पोलिसांनी सध्या घटनेची नोंद करत चौकशी सुरु केली आहे. संबंधित वसतीगृह आदिवासी विकास विभागाशी संबंधित असून त्यांच्या अधिकाऱ्यांनी रॅगिंगच्या प्रकाराबद्दल चौकशी करावी, असं पोलिसांनी म्हटलं आहे. मात्र, सध्या तरी पोलीस अधिकारी कॅमेऱ्यासमोर बोलायला तयार नाहीत. रॅगिंग हा कायदेशीर गुन्हा असताना सरकारच्या एका विभागाद्वारे चालवल्या जाणाऱ्या वसतीगृहातच रॅगिंगचा असा आरोप होणं ही गंभीर बाब आहे.