नाशिक : मनसे अध्यक्ष राज ठाकरे यांनी शिवस्मारकावरुन राज्य सरकारवर जोरदार टीका केली आहे. सरकारकडून शोबाजी सुरु आहे, पुतळे बांधून शिवशाही येत नाही, अशा शब्दात त्यांनी सरकारवर टीका केली आहे.


सरकारने शिवस्मारकासाठी 3600 कोटी रुपये खर्च करणार सांगितलं खरं, पण त्यासाठी पैसा कुठून आणणार, असा सवाल त्यांनी केला आहे.

सरकारकडून फक्त आकडे फेकले जातात. लोक विसराळू आहेत. सरकारने शिवस्मारकावर खर्च करण्यापेक्षा गड-किल्ल्यांवर पैसे खर्च करावे, असंही राज ठाकरे म्हणाले. ते नाशिकमध्ये पत्रकार परिषदेत बोलत होते.

राज ठाकरे यांनी नाशिकमध्ये 112 कोटींच्या सुरु असलेल्या विकासकामांची पाहणी केली. बॉटनिकल गार्डन, फाउंटेन वॉटर, रस्ते अशा अनेक कामांचं लोकार्पण उद्या राज ठाकरेंच्या हस्त केलं जाणार आहे.

विकासकामांची पाहणी करण्यासाठी राज ठाकरे सध्या दोन दिवसीय नाशिक दौऱ्यावर आहेत. यावेळी माध्यमांशी बोलताना त्यांनी सरकारचा समाचार घेतला.