बनावट नोटा छापणाऱ्या छबू नागरेवर देशद्रोहाचा खटला?
एबीपी माझा वेब टीम | 26 Dec 2016 01:35 PM (IST)
नाशिक : नाशिकमध्ये 1 कोटी 35 लाखांच्या बनावट नोटा छापणाऱ्या छबू नागरेसह 11 जणांना अटक केल्यानंतर, आता या रॅकेटचे नवनवे खुलासे समोर येत आहेत. घोटाळेबाज छबू नागरेचा अड्डा शोधून काढण्याचा प्रयत्न 'एबीपी माझा'ने केला. राष्ट्रवादीचा पदाधिकारी असणारा छबू नागरे तब्बल 200 कोटींच्या छपाईचं टार्गेट ठेवून होता, अशी धक्कादायक माहिती समोर आली आहे. मात्र नागरेचे काळे मनसुबे पूर्ण होण्याच्या आत 85 कोटींची डील होत असतानाच नागरेच्या मुसक्या आवळल्या आहेत. नाशिक पोलिसांनी गुरुवारी मध्यरात्री कारवाई करुन 1 कोटी 35 लाखांच्या जुन्या बनावट नोटा जप्त केल्या. तसंच छबू नागरेसह 11 जणांना अटक केली. राष्ट्रवादीशी संबंधित असलेल्या छबू नागरे याच्या खुटवडनगरमधील एका फ्लॅटमध्ये नोटा छपाईचं सामान आढळलं. फ्लॅटमधून पेपर कटिंगचे कटर, 2 प्रिंटर,1 स्कॅनर, आणि वेगवेगळ्या रंगाच्या शाई सापडल्या.