औरंगाबाद : औरंगाबादेत दिवाळीमध्ये लागलेली फटाक्याची आग ही सिगरेटमुळे लागली असल्याचं स्पष्ट झालंय. पोलिसांच्या तपासात ही बाब उघड झाली आहे. एका दुकानदाराने फेकलेल्या सिगरेटने पेट घेऊन हे अग्नितांडव झालं होतं, असा अहवाल पोलिसांनी दिला आहे.

औरंगाबादच्या जिल्हा परिषद मैदानावर 29 ऑक्टोबर रोजी फटाका मार्केटला भीषण आग लागून कोट्यवधीचं नुकसान झालं होतं. इतकचं नाही तर अख्ख शहर धोक्यात सापडलं होतं.

या आगीप्रकरणी पोलिसांनी फटाका असोसिएशनच्या चौघांना अटक केली होती. अखेर पोलिसांचा तपास पूर्ण झाल्यानंतर ही आग एका सिगरेटच्या थोटकामुळे लागली असल्याचं पोलिसांच्या तपासात निष्पन्न झालं.

सिगरेटचे जळके थोटूक 47 क्रमांकाच्या दुकान मालकाने फेकले असल्याने या दुकानदारालाही पोलिसांनी आरोपी ठरवलं आहे. 46, 47 क्रमांकाच्या दुकानापासून सुरू झालेली आग अवघ्या काही मिनिटांमध्ये 144 दुकानांपर्यंत पसरली होती. काही मिनिटांमध्ये 11 कोटींचे नुकसान झाले. यात फटाके, शंभर दुचाकी, चौदा चारचाकी आणि तीन रिक्षा जळून खाक झाले होते.

संबंधित बातम्या :

औरंगाबादमध्ये अग्नितांडव, 142 फटाक्यांची दुकानं पेटली


अग्नितांडव : औरंगाबादमध्ये नेमकं काय घडलं?


औरंगाबाद अग्नितांडव : अग्निशमन दलाचे प्रमुख निलंबित