हैदराबाद सामूहिक बलात्कार आणि हत्या प्रकरणातील चारही आरोपींचा पोलिसांनी एन्काऊंटर केला. एन्काऊंटर नॅशनल हायवे-44 जवळ पहाटे तीन वाजता झाला. या एन्काऊंटरनंतर हैदराबाद पोलिसांचं चहूबाजूंनी कौतुक होत आहेत. हैदराबादमध्ये लोक फुलांचा वर्षाव करत आहेत. एन्काऊंटरची माहिती मिळताच लोक घटनास्थळी पोहोचले. आता परिस्थिती अशी आहे की लोक पोलिसांना खांद्यावर उचलून त्यांच्या समर्थनार्थ घोषणाबाजी केली.
हैदराबादमध्ये महिला डॉक्टरवर झालेल्या सामूहिक बलात्कार आणि हत्या प्रकरणातील आरोपींचा तेलंगणा पोलिसांनी आज पहाटे एन्काऊंटर केला. हैदराबादच्या राष्ट्रीय महामार्ग 44वर पोलिसांनी चकमकीत त्यांना कंठस्नान घातलं. हैदराबाद गँगरेपच्या या घटनेचं रिकंस्ट्रक्शन करण्यासाठी पोलिस चारही आरोपींना घटनास्थळी घेऊन गेले होते. पोलिसांच्या माहितीनुसार चारही आरोपींनी तिथून पळ काढण्याचा प्रयत्न केल्याने त्यांच्यावर गोळ्या झाडल्या. दरम्यान या एन्काऊंटर प्रकरणाची न्यायालयीन चौकशी करण्यात येणार आहे. तसंच इनकॅमेरा पोस्टमार्टम होणार असल्याचीही माहिती मिळते.
27 नोव्हेंबरला काय घडलं?
पोलिसांच्या माहितीनुसार, 27 नोव्हेंबरच्या रात्री महिला डॉक्टरचं ट्रक चालक आणि त्याच्या साथीदारांनी अपहरण केलं. आरोपी तरुणीला निर्जन स्थळी घेऊन गेले आणि तिला जबरदस्तीने दारु पाजली. त्यानंतर तिच्यावर सामूहिक बलात्कार केला. एका आरोपीने तिचं तोंड आणि नाक दाबून तिचा जीव घेतला. यानंतर तिथून 27 किमी अंतरावर जाऊन पेट्रोल टाकून तिचा मृतदेह जाळला. तिच्या मृतदेहाशेजारीच फोन आणि घड्याळ लपवलं.