यवतमाळ : मनसे अध्यक्ष राज ठाकरे यांनी आगामी विधानसभा निवडणुकांच्या पार्श्वभूमीवर महाराष्ट्र दौरा सुरू केला असून सध्या ते विदर्भात मनसैनिकांच्या भेटी घेत आहेत. सोलापूरमधून सुरु केलेल्या महाराष्ट्र दौऱ्यात राज ठाकरेंनी 2 उमेदवारांची घोषणा केली होती. त्यानंतर, सुरू असलेल्या दौऱ्यात त्यांच्याकडून विधानसभा उमेदवारांची घोषणा होत असून आत्तापर्यंत 7 मतदारसंघांत त्यांनी मनसेच्या उमेदवारांची घोषणा केली आहे. आज यवतमाळ येथील वणीमध्ये राज ठाकरेंच्या प्रमुख उपस्थितीत मनसेचा मेळावा होता. या मेळाव्यात व्यासपीठावर राज ठाकरे बोलत असताना मनसेकडून पॅराग्लायडिंगच्या माध्यमातून मनसेचं शक्तीप्रदर्शन करण्यात येत होतं. त्याचवेळी, पॅराग्लायडिंग करणाऱ्या व्यक्तीकडे पाहत राज ठाकरेंनी भाषण केलं, त्यावेळी उपस्थितांमध्ये हशा पिकल्याचं पाहायला मिळालंय 


राज ठाकरेंचं (Raj Thackeray) भाषण म्हणजे कार्यकर्ते व पदाधिकाऱ्यांसाठी पर्वणीच असते. आज विदर्भ दौऱ्यात वणी येथे राज ठाकरेंनी छोटेखानी भाषण केलं, तेव्हा त्यांच्या स्वागतासाठी पॅराग्लायडिंगच्या माध्यमातून मनसेच्या (MNS) झेंड्याद्वारे अवकाशात अभिवादन केले जात होते. नेमकं राज यांचं भाषण सुरू असतानाच, त्यांच्या डोक्यावर हे पॅराग्लायडिंग गिरट्या घालत होते, तेव्हा राज यांनी अरे थांबव रे बाबा.. असे म्हणत ते थांबवायला सांगितले. मात्र, तरीही त्याच्या गिरट्या सुरूच होते, पॅराग्लायडिंगचा तो आवाज राज ठाकरेंच्या भाषणाला बाधक ठरत होता. तेव्हा, राज ठाकरेंनी 2-3 वाक्य उच्चारली अन् एकच हशा पिकला. पॅराग्लायडिंग करणाऱ्या माणसाकडे पाहात राज ठाकरे म्हणाले, माणूस आहे का त्याच्यात, उतरेल ना व्यवस्थित?, इथं नाही ना येणार?. नाहीतर साहेब चुकलो, साहेब चुकलो म्हणून इकडेच यायचा, असे राज यांनी म्हटले, त्यावर मनसैनिकांनी हसून दाद दिली.


पोलिसांवर राज्यकर्त्यांचा दबाव


राज ठाकरेंनी आपल्या भाषणात बदलापूर बाललैंगिक अत्याचाराच्या घटनेचा संदर्भ देत, राज्यात राजरोस अशा घटना घडत आहेत. त्यामागील मुख्य कारण म्हणजे राज्यात कायद्याचा वचक उरलेला नाही. या सर्व प्रकरणात पोलिसांचा अजिबात दोष नाही. त्यांच्यावर जो वरच्या राज्यकर्त्यांचा दबाव असतो, त्या दबावामुळे त्यांना तसं वागावं लागतं. कारण पोलिसांनी कुठल्या गोष्टी करायला घेतल्या तर पोलिसांचं निलंबन होतं. पोलिसांमागे चौकशा आणि निलंबनाच्या कारवाई केली जाते. मात्र, जे लोक सत्तेत बसले आहे त्यांच्या कधीही चौकशा केल्या जात नाहीत. कुठली परिस्थिती हाताळण्यासाठी पोलिसांच्या हातात आज काहीही नाही. मात्र दोष द्यायची वेळ आलीच तर त्यांना जबाबदार धरलं जाते, असे म्हणत राज ठाकरेंनी सत्ताधाऱ्यांवर निशाणा साधत पोलिसांची बाजू मांडली. 


एकदा माझ्या हाती सत्ता देऊन बघा


अनेकांना असं वाटतं की राज ठाकरे हे सहज बोलतात. मात्र,  मी सहज कुठलीही गोष्ट बोलत नाही. आपण एकदा या राज ठाकरेच्या हातात या राज्याची सत्ता देऊन बघा. राज्य कसं हाताळलं जातं हे मी तुम्हाला दाखवून देईल. कायद्याची भीती काय असते, हे मी तुम्हाला दाखवून देईल आणि परत महिलांकडे बघण्याची कुणाची वक्रदृष्टी होणार नाही, असा विश्वासही राज ठाकरे यांनी येथील मेळाव्यात बोलताना व्यक्त केलाय.



हेही वाचा


मनोज जरांगेंची मोठी घोषणा, आता, शेतकऱ्यांच्या कर्जमाफीसाठी आंदोलन; तारीखही जाहीर 


राज ठाकरेंची घोडदौड, विधानसभेसाठी मनसेचा सातवा उमेदवार जाहीर; वणीतून घोषणा