पुणे : शिवसेना, राष्ट्रवादी आणि काँग्रेसने राज्यात महाआघीडचं सरकार स्थापन केलं, हा महाराष्ट्रातील मतदारांचा अपमान आहे, असं मनसे अध्यक्ष राज ठाकरे यांनी म्हटलं आहे. निवडणुकांपूर्वी ज्या नेत्यांनी पक्षांतर केलं त्यांना राज्यातील जनतेने धडा शिकवला आहे. मात्र जनतेनं इतका चांगला कौल दिल्यानंतरही या पक्षांनी सत्तेसाठी प्रतारणा करावी, यासारखं दुर्दैव नाही, असंही राज ठाकरे यांनी म्हटलं.


शिवसेना, राष्ट्रवादी आणि काँग्रेसच्या भूमिकेमुळे जनतेमध्ये प्रचंड नाराजी आहे. याचा परिणाम आगामी निवडणुकांवर होण्याची दाट शक्यता आहे. महाविकास आघाडी सरकारचं सध्या सुरु असलेलं समीकरण फार दिवस चालणार नाहीत, असंही राज ठाकरेंनी भाकीत वर्तवलं. शरद पवारांच्या साताऱ्यातील पावसातील सभेनंतर जे बोललं गेलं, ते त्यांच्याबद्दल आधी बोललं जात नव्हतं. त्यामुळे यशाला बाप खुप असतात आणि पराभवाला सल्लागार खुप असतात, असं राज ठाकरे म्हणाले.


मनसेचा महामेळावा बाळासाहेब ठाकरे यांच्या जयंती दिवशी 23 जानेवारीला पार पडणार आहे. मनसेचे पहिले अधिवेशन मुंबईत आहे. विधानसभा निवडणुकीदरम्यान काही गोष्टी झाल्या त्यावर मी मेळाव्यात बोलेन, असंही राज ठाकरे यांनी सांगितलं. बाळासाहेब ठाकरे यांच्या जयंतीला मेळावा ठेवलाय, कारण त्या दिवशी हॉल मिळाला, असंही राज ठाकरेंनी सांगितलं.


आर्थिक मंदीवरुन देशाचं लक्ष हटवण्यासाठी  CAA ची खेळी


देशाचं लक्ष विचलित करण्यासाठी, आर्थिक मंदीवरुन देशाचं लक्ष हटवण्यासाठी अमित शाह यांनी CAA आणि NRC ची खेळी केली आहे. त्यात ते यशस्वी झाले आहेत. त्यासाठी त्यांचं अभिनंदन करत राज यांनी अमित शाहांना टोला लगावला आहे. CAA आणि NRC सारख्या कायद्यांमध्ये खूप मोठा गोंधळ आहे. मोदी सरकारचा नोटबंदीच्या काळात जसा गोंधळ होता, अगदी तसाच गोंधळ आताही पाहायला मिळत आहे, असं राज ठाकरेंनी म्हटलं.


आपल्या देशात 135 कोटी लोक राहात आहेत. या लोकांचा भार सांभाळण्यात देश कमी पडत आहे. अशा परिस्थितीत CAA द्वारे बाहेरच्या लोकांना आपण भारतात घेत आहोत. त्यांची व्यवस्था कोण करणार? असा प्रश्न राज ठाकरेंनी विचारला. पिढ्यांपिढ्या भारतात राहणारे किती मुसलमान या मोर्चांमध्ये सामील आहेत आणि बाहेरचे किती मुसलमान त्यात आहेत, हेदेखील पाहायला हवा, असंही राज ठाकरेंनी म्हटलं.




संबंधित बातम्या