मुंबई : नागरिकत्व दुरुस्ती कायद्याला (CAA) देशभरातून अनेक लोक विरोध करत आहेत. CAA विरोधात देशभरात आंदोलनं सुरु आहेत. या मुद्द्यावरुन मनसे अध्यक्ष राज ठाकरे यांनी केंद्रीय गृहमंत्री अमित शाह यांना लक्ष्य केले. तसेच राज यांनी CAA, NRC सारखे कायदे केवळ गोंधळ निर्माण करणारे आहेत, त्याची आवश्यकता नव्हती, असे मत व्यक्त केले.


राज ठाकरे म्हणाले की, CAA द्वारे भारत इतर देशातून आलेल्या हिंदू, शीख, बौद्ध, पारशी, ख्रिश्चन, जैन लोकांचा स्वीकार करेल. परंतु देशाची लोकसंख्या 135 कोटी इतकी आहे. या लोकांचा भार सांभाळण्यात देश कमी पडतोय. अशा परिस्थितीत बाहेरच्या लोकांना आपण भारतात घेत आहोत. त्यांची व्यवस्था कोण करणार? सर्वांना सामावून घेण्यासाठी भारत ही काही धर्मशाळा नाही. लोकांच्या सोयीसाठी हा देश नाही. माणुसकीचा ठेका केवळ भारताने घेतलेला नाही.


राज ठाकरे म्हणाले की, घुसखोरी करणाऱ्या लोकांना देशातून बाहेर काढायचे असेल, तर त्यासाठी आपले पोलीस सक्षम आहेत. पोलिसांना माहित आहे की, बाहेरच्या देशातून आलेले लोक, प्रामुख्याने बांगलादेशातून आलेले घुसखोर कुठे राहतात? केंद्र सरकारने ती जबाबदारी राज्य सरकारांवर सोपवायला हवी. आपल्याला शासकीय यंत्रणा सुधारण्याची गरज आहे, कडक कारवाई करण्याची आवश्यकता आहे.


राज म्हणाले की, घुसखोरांना शोधण्यासाठी, त्यांची हकालपट्टी करण्यासाठी आंतरराज्यीय स्थलांतर कायदा (interstate migration act) आहे. या कायद्याचा वापर करुन प्रत्येक राज्य सरकार घुसखोरांवर कारवाई करु शकतं. परंतु त्यासाठी राज्य सरकारांनी पुढाकार घ्यायला हवा. पोलिसांना मोकळीक द्यायला हवी. महाराष्ट्र सरकारनेही आपल्या पोलिसांचा हात मोकळा करावा, त्यानंतर सर्व गोष्टी समोर येतील.


राज ठाकरे यांनी याबाबत युरोपीय देशांचे एक उदाहरण दिले. राज म्हणाले युरोपातील इंग्लंड, फ्रान्स, इटली तसेच अमेरिकेसारख्या देशांमध्ये तिथले पोलीस स्वतः संशयितांची चौकशी करतात. अशा वेळी घुसखोर सापडले की, आम्ही तुम्हाला तुमच्या मायदेशी पाठवतो अथवा तुरुंगात पाठवू असे दोन पर्याय त्यांच्यासमोर ठेवतात. अशा प्रकारची कारवाई आपले महारष्ट्र पोलीसदेखील करु शकतात. विशेष म्हणजे पोलिसांकडे मुंबईसारख्या शहरात राहणाऱ्या घुसखोरांची माहिती आहे. असे असताना नागरिकत्व दुरुस्ती कायदा आणून गोंधळ घालण्याची आवश्यकता होती का? असा सवाल राज यांनी उपस्थित केला.