पुणे : नागरिकत्व दुरुस्ती कायद्याला (CAA) देशभरातून अनेक लोक विरोध करत आहेत. CAA विरोधात देशभरात आंदोलनं सुरु आहेत. या मुद्द्यावरुन मनसे अध्यक्ष राज ठाकरे यांनी केंद्रीय गृहमंत्री अमित शाह यांना लक्ष्य केले. राज ठाकरे म्हणाले की, देशासमोर आर्थिक मंदीचं मोठं संकट उभं आहे. यावरुन केंद्र सरकार मतदारांच्या कोंडीत सापडलं असतं. परंतु नागरिकत्व दुरुस्ती कायदा (CAA) आणि राष्ट्रीय नागरित्व नोंदयादी (NRC) यांचे मुद्दे काढून अमित शाहांनी देशाचं लक्ष विचलित केलं आहे.
राज ठाकरे म्हणाले की, देशाचं लक्ष विचलित करण्याठी, आर्थिक मंदीवरुन देशाचं लक्ष हटवण्यासाठी अमित शाह यांनी CAA आणि NRC ची खेळी केली आहे. त्यात ते यशस्वी झाले आहेत. त्यासाठी त्यांचं अभिनंदन करत राज यांनी अमित शाहांना टोला लगावला आहे.
देशात आर्थिक मंदीची सुरुवात झाली आहे. येत्या काळात आपल्याला खऱ्या अर्थाने आर्थिक मंदीला सामोरं जायचं आहे. आपण हे CAA आणि NRC सारखे कायदे पाहतोय, यात खूप मोठा गोंधळ आहे. मोदी सरकारचा नोटबंदीच्या काळात जसा गोंधळ होता, अगदी तसाच गोंधळ आत्ताही पाहायला मिळतोय.
राज ठाकरे म्हणाले की, आधार कार्डद्वारे लोक मतदान करतात, मग त्यावरुन नागरिकत्व का सिद्ध होऊ शकत नाही, आणि जर आधार कार्डाचा काहीही उपयोग नसेल तर त्यासाठी लोकांना रांगेत का उभं केलं? हा सर्व खाटाटोप केला, तो कशासाठी होता?
राज ठाकरे म्हणाले की, आपल्या देशात 135 कोटी लोक राहात आहेत. या लोकांचा भार सांभाळण्यात देश कमी पडतोय. अशा परिस्थितीत CAA द्वारे बाहेरच्या लोकांना आपण भारतात घेत आहोत. त्यांची व्यवस्था कोण करणार?
राज ठाकरे यांनी देशभरात सुरु असलेल्या हिंसक आंदोलनांबाबतही भाष्य केले. राज म्हणाले की, पिढ्यान पिढ्या भारतात राहणारे किती मुसलमान या मोर्चांमध्ये सामील आहेत आणि बाहेरचे किती मुसलमान त्यात आहेत. हेदेखील पाहायला हवा.
राज ठाकरे म्हणाले की, महाराष्ट्रातल्या मुसलमानांना असुरक्षित वाटण्याचं कारण नाही. असे म्हणत राज यांनी महाराष्ट्रातील मुस्लीम बांधवांना आश्वस्त केले.