Raj Thackeray on Maharashtra Bhushan Award: नवी मुंबईच्या खारघरमध्ये (Kharghar) रविवारी आप्पासाहेब धर्माधिकारी (Appasaheb Dharmadhikari) यांना महाराष्ट्र भूषण पुरस्कार (Maharashtra Bhushan Award) देण्यात आला. या कार्यक्रमाला लाखो श्रीसेवक आले होते. मात्र उष्माघातामुळे 12 श्रीसेवकांचा मृत्यू झाला. तर 15 श्रीसेवकांवर कामोठेमधील एमजीएम रुग्णालयात उपचार सुरू आहेत. त्यातील दोघांची प्रकृती गंभीर आहे. यामुद्द्यावरुन मनसे अध्यक्ष राज ठाकरे यांनी राज्य सरकारवर निशाणा साधला आहे. प्रचंड ऊन असल्यानं सोहळा संध्याकाळी ठेवावा, हे प्रशासनाला कळलं नाही का? असं म्हणत राज ठाकरे (Raj Thackeray) यांनी ट्वीटमधून सरकारवर निशाणा साधला आहे. तसेच, राज ठाकरेंनी नवी मुंबईतील (Navi Mumbai) एमजीएम रुग्णालयात जाऊन उपचार घेत असलेल्या श्रीसेवकांची भेटही घेतली. त्यावेळी हा घडलेला प्रकार राज्य सरकारला टाळता आला असता अशीही प्रतिक्रिया राज ठाकरेंनी दिली आहे. 


राज ठाकरेंनी यासंदर्भात एक ट्वीट केलं आहे. ते म्हणाले की, "काल ज्येष्ठ निरुपणकार आप्पासाहेब धर्माधिकारी यांना महाराष्ट्र भूषण पुरस्कार प्रदान झाला, ही अतिशय आनंदाची बाब आहे. हा पुरस्कार जेव्हा घोषित झाला तेव्हा मी आप्पासाहेबांचं आणि सरकारचं अभिनंदन केलं होतं. पण या सोहळ्याला जे गालबोट लागलं ते टाळता आलं नसतं का? कधी नव्हे ते मुंबईतसुद्धा उष्माघाताच्या बातम्या वाचायला मिळत असताना, इतक्या कडाक्याच्या उन्हात हा कार्यक्रम न करता त्याची वेळ संध्याकाळची असावी हे प्रशासनाला कळलं नाही का?"






"सरकारनं जरी मृतांच्या नातेवाईकांना मदतीची घोषणा केली असली तरी इतक्यावर न थांबता अशा दुर्दैवी घटना पुन्हा होणार नाहीत आणि प्रशासन अशा चुका करणार नाही याची काळजी घ्यावी. या घटनेत मृत्युमुखी पडलेल्या श्रीसदस्यांच्या कुटुंबियांच्या दुःखात महाराष्ट्र नवनिर्माण सेना सहभागी आहे.", असंही राज ठाकरे ट्वीटमध्ये म्हटले आहेत. 


मनसे अध्यक्ष राज ठाकरे यांनी नवी मुंबईतील एमजीएम रुग्णालयात जाऊन कालच्या कार्यक्रमात सहभागी झालेल्या आणि सध्या उष्माघातावर उपचार घेत असलेल्या श्रीसेवकांची भेट घेतली. तसेच, त्यांनी विचारपूसही केली. 


दरम्यान, काल (रविवारी) नवी मुंबईतील खारघरमध्ये आप्पासाहेब धर्माधिकारींना महाराष्ट्र भूषण पुरस्कारानं गौरवण्यात आलं. या कार्यक्रमाला लाखो श्रीसेवक आले होते. मात्र उष्माघातामुळे 12 श्रीसेवकांचा मृत्यू झाला. तर 15 श्रीसेवकांवर कामोठेमधील एमजीएम रुग्णालयात उपचार सुरू आहेत. त्यातील दोघांची प्रकृती गंभीर आहे. मुख्यमंत्री एकनाथ शिंदे आणि उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी काल रात्री रुग्णांची विचारपूस केली. मृतांच्या नातेवाईकांना पाच लाखांची मदत मुख्यमंत्र्यांनी जाहीर केली. रविवारी एकूण 300 श्रीसेवकांना उष्माघाताचा त्रास झाला. त्यातील अनेकांना प्राथमिक उपचार देऊन घरी सोडण्यात आलं. मात्र 32 जणांची प्रकृती गंभीर होती. त्यापैकी 11 जणांचा मृत्यू झाला आहे. 


महत्त्वाच्या इतर बातम्या : 


Maharashtra Bhushan : दुर्घटनेला सांस्कृतिक विभाग दोषी, आयोजकांवर सदोष मनुष्यवधाचा गुन्हा दाखल करा : अंबादास दानवे