Raj Thackeray: बदलापूरमध्ये एका नामांकित शाळेत दोन चिमुकल्या मुलींवर घडलेल्या लैंगि अत्याचाराच्या घटनेनं राज्याला हादरवून सोडलं आहे, या घटनेचे पडसाद राज्यभरात उमटताना दिसत आहे, या घटनेतील दोषी नराधमावरती कठोर कारवाई व्हावी, आणि ती लवकरात लवकर व्हावी अशी मागणी केली जात आहे. त्याचबरोबर सर्व राजकीय पक्षांनी देखील याबाबत आंदोलने मुक मोर्चे काढायला सुरूवात केली आहे, यादरम्यान सत्ताधारी आणि विरोधक यांच्यामध्ये या प्रकरणावरून आरोप प्रत्यारोप करणं सुरू आहे, यादरम्यान मनसे अध्यक्ष राज ठाकरे (Raj Thackeray) यांनी प्रतिक्रिया देत गुन्हागारांना शिक्षा द्यायला इतका वेळ लागतोच कसा? असा सवाल देखील उपस्थित केला आहे.
काय म्हणालेत राज ठाकरे?
बदलापूरमध्ये जे घडलं ते भीषण आणि दुर्दैवी आहे. माझ्या पक्षाच्या महिला पदाधिकाऱ्यांनी हा विषय लावून धरला. पण महाराष्ट्रात महिलांवरील अत्याचारांच्या घटना वाढत आहेत. बलात्कार ते हुंडाबळी ते छेडछाड या घटना वर्षागणिक वाढत आहेत. २०२३ मध्ये महाराष्ट्रात ७००० हुन अधिक बलात्काराच्या घटना घडल्या ज्यांची पोलिसांकडे नोंद झाली. ज्याची नोंद नाही झाली अशी प्रकरणं त्याहून अधिक आहेत.
बीड,सांगली येथे ऊसतोड कामगार महिलांची गर्भाशयं काढून घेण्याच्या घटना मोठ्या प्रमाणावर आढळून येत आहेत आणि इतक्या घटना घडून पण कठोर कायदे होत नाहीत. दिल्लीत निर्भया प्रकरण घडलं. त्या निर्घृण प्रकारातील दोषींना तब्बल १२ वर्षांनी फाशी झाली. दोषींना शिक्षा द्यायला इतका वेळ लागतोच कसा? बरं, असं नाहीये महायुती सरकारच्या काळात महिलांवरचे अत्याचार वाढलेत, तर हे अत्याचार महाविकास आघाडी सरकारच्या काळात पण घडले होते. पण आज दोघेही एकमेकांवर फक्त दोषारोप करत आहेत, पण या घटनांबद्दल कोणीच गंभीर नाही हे दुर्दैव आहे, असंही राज ठाकरेंनी (Raj Thackeray) म्हटलं आहे.
पुण्यात आज महाविकास आघाडीकडून मूक मोर्चाचं आयोजन
महाविकास आघाडीच्या वतीने राज्यात ठिकठिकाणी 'निषेध आंदोलन' केले जात आहे. आज पुण्यातही भर पावसात महाविकास आघाडीच्या नेत्यांनी मूक आंदोलन केलं. या आंदोलनात शरद पवार (Sharad Pawar), सुप्रिया सुळे(Supriya Sule), काँग्रेसचे आमदार रविंद्र धंगेकर (Ravindra Dhangekar) यांच्यासह अन्य नेते सहभागी झाले होते. तोंडाला काळा मास्क लावून आणि हाताला काळी फित बांधून शरद पवार या आंदोलनात सहभागी झाले आहेत. तर या मूक आंदोलनासाठी रमेश बागवे, मोहन जोशी, शिवसेनेचे बाबर, प्रशांत जगताप, रविंद्र धंगेकर, अरविंद शिंदे, संगिता तिवारी, वंदना चव्हाण, आबा बागुल उपस्थित आहेत.