MNS Will Contest Municipal Elections on its Own : राज्यात सध्या महापालिका निवडणुकांचे वारे वाहू लागले आहेत. महापालिका निवडणुकांसाठी राज ठाकरेंची मनसे (MNS) ही भाजप (BJP) आणि शिंदे गटाशी (CM Eknath Shinde) हातमिळवणी करणार का? या प्रश्नाची जोरदार चर्चा रंगली असतानाच मनसेनं 'एकला चलो रे'चा नारा दिला आहे. राज ठाकरे (Raj Thackeray) यांच्या आदेशानंतर मुंबई महापालिकांमध्ये सर्व जागांवर लढण्याची तयारी सुरु केल्याची माहिती मनसे नेते संदीप देशपांडे (Sandeep Deshpande) यांनी दिली आहे. गेल्या काही दिवसांत भाजप नेते आणि राज ठाकरेंच्या भेटीगाठी वाढल्या होत्या. तसंच गणपती दर्शनाच्या निमित्तानं मुख्यमंत्री एकनाथ शिंदे आणि राज ठाकरे हे दोनदा एकमेकांना भेटले. त्यामुळे मनसेच्या इंजिनाला दोन नवीन डबे मिळणार असल्याची चर्चा सुरु होती. मात्र आता मनसेनं स्वबळाचा नारा देत भूमिका स्पष्ट केली.


आगामी काळात महापालिकेच्या निवडणुका मनसे स्वबळावर लढवणार आहे. राज ठाकरेंच्या आदेशानुसार, मुंबईत 227 जागांवर उमेदवार उभे करणार असल्याची माहिती मनसे नेते संदीप देशपांडे यांनी दिली आहे. तसेच, आम्ही स्वातंत्र्य आहोत सध्या आमचा कुणासोबतही न जाण्याचा निर्णय झाला आहे, असंही संदीप देशपांडे यांनी स्पष्ट केलं आहे. 


दरम्यान, शिवसेना-भाजप युती तुटल्यानंतर मुंबई महापालिका निवडणुकांमध्ये मराठी मतांची पोकळी भाजप कशी भरणार? हा सवाल उपस्थित होत होता आणि यासाठीच कदाचित मनसेला भाजप जवळ करू शकतो, अशी देखील चर्चा होती. अशातच मध्यंतरीच्या काळात पुलाखालून बरंच पाणी गेलं. राज्यात शिंदे फडणवीस सरकारं आलं. त्यानंतर मनसे सोबतच्या युतीच्या चर्चांनी जोर धरला होता. 


सध्या सत्तेमध्ये भाजपसोबत शिंदे गट देखील आहे. यामध्ये शिंदे गटातील सहभागी आमदारांचा पालिका निवडणुकात किती फायदा होईल याबाबत सांशता आहे. मात्र जर सोबत मनसे असेल तर नक्कीच मराठी मतं आपलीशी करता येतील, याची खात्री भाजप आणि शिंदे गटाला आहेत. त्यामुळेच गणेशोत्सवादरम्यान, झालेल्या मुख्यमंत्री आणि राज ठाकरेंच्या भेटीला वेगळं महत्त्वा प्राप्त झालं होतं. त्यामुळे आता मुंबई महापालिकेत भाजप-शिंदे गट आणि मनसे एकत्र येणार असल्याचंही बोललं जात होतं. परंतु, आज मनसे प्रवक्ते संदीप देशपांडे यांनी दिलेल्या स्वबळाच्या नाऱ्यामुळे महापालिका निवडणुकांमध्ये मनसे स्वबळावरच निवडणूक लढवणार असल्याचं जवळपास स्पष्ट झालं आहे.  


महत्त्वाच्या इतर बातम्या :