मुंबई : राज्यात येत्या 15 तारखेपर्यंत हलक्या किंवा मोठ्या स्वरुपात पाऊस होईल, असा अंदाज हवामान तज्ज्ञ रामचंद्र साबळे यांनी व्यक्त केला आहे. त्यामुळे महाराष्ट्रात अजूनही पाऊस कायम राहणार असल्याचे चित्र आहे.
काही दिवसांपूर्वीच परतीचा पाऊस माघारी गेल्याची अधिकृत घोषणा झाली होती.
येत्या 15 ऑक्टोबरपर्यंत राज्यातील अनेक ठिकाणी कमी ते मध्यम स्वरुपाचा पाऊस होईल, असा अंदाज हवामान तज्ज्ञ रामचंद्र साबळे यांनी व्यक्त केला आहे.
दरम्यान, मुंबईसह कोकणात रिपरिप सुरुच आहे. कोकण पट्ट्यात काल रात्रीपासून रत्नागिरी, रायगड आणि सिंधुदुर्गात पावसाची संततधार सुरुच होती. तर दुसरीकडे मराठवाड्यात पावसाने विश्रांती घेतली असली, तरी अनेक ठिकाणी पूरसदृश्य परिस्थिती कायम आहे.
उस्मानाबादमधील माकणी धरण गेल्या सहा वर्षानंतर भरल्यानं धरणाचे चौदा दरवाजे उघडले आहेत. त्यामुळे लातूर आणि उस्मानाबाद जिल्ह्यातल्या तेरणा नदी काठच्या सर्व गावांना सतर्कतेचा इशार देण्यात आला आहे.