मुंबई: विदर्भामधल्या काही जिल्ह्यात मान्सूनपूर्व पावसानं हजेरी लावली आहे. वर्ध्यामध्ये मध्यरात्री विजेच्या कडकडाटसह जोरदार पाऊस बरसला. त्यामुळे अनेक भागांमधील वीजपुरवठाही खंडीत करण्यात आला होता. तर नागपूरमध्ये देखील पावसाच्या सरी कोसळल्या. त्यामुळं गेल्या काही दिवसांपासून उकाडा सहन करणारे नागपूरकर थोडा का होईना गारवा सध्या अनुभव आहेत.


मुंबई आणि जवळच्या परिसरात आज सकाळपासूनच ढगाळ वातावरण आहे. त्यामुळे मुंबईतही लवकरच पावसाच्या सरी बरसतील अशी मुंबईकर आशा आहे.

दुसरीकडे भंडारा जिल्ह्यातही मान्सूनपूर्व पावसानं काल संध्याकाळी दमदार हजेरी लावली. जवळपास 1 तास संपूर्ण जिल्ह्यात पाऊस पडला. गेल्या काही दिवसापासून भंडाऱ्यातील पारा चांगलाच वाढला होता. मात्र, या पावसामुळे आता वातावरणात गारवा निर्माण झाला आहे.

गोंदिया जिल्ह्यातही काल संध्याकाळच्या सुमारास मुसळधार पाऊस पडला. पण या पावसामुळे रब्बी पिकांचं नुकसान झाले आहे.
दरम्यान मान्सून केरळमध्ये 30 जूनपर्यंत दाखल होईल, असं भारतीय हवामान विभागाने सांगितलं आहे. मात्र राज्यात मान्सून कधीपर्यंत दाखल होईल, याबाबत अजून काहीही माहिती देण्यात आलेली नाही.

संंबंधित बातम्या:

''मान्सून राज्यात वेगाने येणार, 2, 3 आणि 4 जूनला पावसाचा अंदाज''