मुंबई : राज्यात मान्सून दाखल झालाय. मुंबईसह प्रत्येक विभागात पावसाने मोठ्या प्रमाणात हजेरी लावली आहे. काही ठिकाणी नद्यांना पूर आल्यामुळे जनजीवन विस्कळीत झालंय, तर पावसामुळे सौंदर्य फुललेल्या ठिकाणी पर्यटक गर्दी करत आहेत.

महाबळेश्वरला पर्यटकांची गर्दी

पावसाची राजधानी अशी ओळख असलेल्या महाबळेश्वरात पावसाने आपले रंग दाखवण्यास सुरुवात केली आहे. त्यामुळे पावसाची ओढ लागलेल्या पर्यटकांची पावले आता महाबळेश्वराकडे वळली आहेत. पाचगणी आणि कोयना धरण परिसरात सर्वाधिक पावसाची नोंद झाली आहे.

दुसरीकडे पश्चिम घाटाला लागून असलेल्या कोल्हापूर जिल्ह्यातही पावसाने धुमाकूळ घातला आहे. विशेषतः जिल्ह्याच्या पश्चिमेला असलेल्या तालुक्यांमध्ये पावसाने कहर केला आहे.

गगनबावडा तालुक्यात एका दिवसात तब्बल 64 मिलिमीटर पावसाची नोंद झाली. तर भुदरगड, चंदगड, गडहिंग्लज, आजरा, राधानगरी या तालुक्यांनाही पावसाने झोडपून काढलं. जिल्ह्यातल्या पंचगंगा, दूधगंगा, हिरण्यकेशी, घटप्रभा या नद्यांच्या पातळ्यांमध्ये अचानक वाढ झाली आहे.

सांगली जिल्ह्यातही मुसळधार नसला, तरी पावसाची संततधार कायम आहे. गेल्या दोन दिवसांपासून फक्त वाकुल्या दाखवून जाणाऱ्या ढगांनी आज बरसायला सुरुवात केली. शिवाय पश्चिम घाटात सुरु असलेल्या पावसाने कोयना, वारणा आणि कृष्णा नद्यांचं पाणी वाहण्यास सुरुवात झाली आहे.

कोकणात नद्यांना पूर

मुसळधार पावसाच्या प्रतीक्षेत असलेल्या रत्नागिरीकरांना अखेर मुसधार पावसाने गाठलं. आज दिवसभर झालेल्या पावसाने रत्नागिरीकरांची त्रेधा उडवली. रत्नागिरीसह चिपळूण शहरातल्या सखल भागांमध्ये पावसाचं पाणी साचलं. अनेक रस्ते पाण्याखाली गेले. दुसरीकडे मांदरे गावातल्या गुहागर मार्गावरच्या घाटात दरड कोसळली. त्यामुळे काही तास हा रस्ता बंद होता.

मान्सूनसाठी महाराष्ट्राचे प्रवेशद्वार असलेल्या सिंधुदुर्गात आज पावसाने उसंत घेतलेली असली, तरी अधूनमधून येणाऱ्या मुसळधार सरींमुळे जिल्ह्यात पाणीपाणी झालं आहे. विशेषतः आंबोली हिल स्टेशनवर कोसळणाऱ्या पावसामुळे पश्चिम वाहिनी नद्या प्रवाही झाल्या आहेत. आंबोलीतल्या पावसाने पर्यटकांचीही पावले वळू लागली आहेत.

मालवण, वेंगुर्ले, सावंतवाडी, कुडाळ, दोडामार्ग, कणकवली, देवगड आणि वैभववाडी या तालुक्यांमध्ये भरपूर पाऊस झाला आहे. सावंतवाडी आणि कणकवली तालुक्यात काही घरांवर झाड कोसळून नुकसानही झालं आहे. तर रत्नागिरी जिल्ह्यात होत असलेल्या मुसळधार पावसाने ग्रामीण भागातील नद्या दुथडी भरून वाहू लागल्या आहेत. खेडशी गावात नदीचं पाणी सखल भागात घुसल्याने अनेक ठिकाणी पूर स्थिती निर्माण झाली. लोकांना सतर्क राहण्याचा इशारा देण्यात आला आहे.

अमरावतीकरांना दिलासा

आतापर्यंत घामाने भिजलेल्या अमरावतीकरांवर अखेर आज वरुणराजा प्रसन्न झाला. मान्सूनच्या आगमनामुळे वादळी वाऱ्यासह मुसळधार पावसाने सुरुवात केली. पावसाने सलगचा जोर धरलेला नसला तरी अधूनमधून कोसळणाऱ्या सरींनी वातावरण थंडगार झालं आहे.

विदर्भात अजून म्हणावा तसा पाऊस दाखल झालेला नाही. नागपूर आणि गडचिरोली या जिल्ह्यांमध्ये रिमझिम पाऊस आहे. मात्र विदर्भातील बहुतांश जिल्हे अजून मुसळधार पावसाच्या प्रतीक्षेत आहेत. यवतमाळ, अकोला, बुलडाणा, चंद्रपूर या जिल्ह्यांमध्ये पावसाची प्रतीक्षा आहे.

मराठवाड्याला मोठ्या पावसाची प्रतीक्षा


मराठवाड्यात अजून म्हणावा तसा पाऊस झालेला नाही. लातूर जिल्ह्यात चांगला पाऊस झाला असला तरी इतर सात जिल्हे पावसाच्या प्रतीक्षेत आहेत. लातूरमध्ये काल झालेल्या पावसाने नद्यांना पूर आला होता. शिरुर अनंतपाळ तालुक्यात काल झालेल्या पावसात नदीला पूर आल्याने पुलावरुन जाताना एक व्यक्ती वाहून गेला, ज्यामध्ये त्याचा मृत्यू झाला.

उत्तर महाराष्ट्रात मान्सूनचा पाऊस नाही

राज्यात मान्सून दाखल झाला असला तरी उत्तर महाराष्ट्राला मान्सूनच्या पावसाची प्रतीक्षा आहे. मान्सून पूर्व पावसाने उत्तर महाराष्ट्रातील नाशिक, धुळे, जळगाव आणि नंदुरबार या जिल्ह्यांमध्ये हजेरी लावली. मात्र गेल्या दोन दिवसांपासून पाऊस झालेला नाही.