सिंधुदुर्ग : अवकाळी पावसाने आजही सिंधुदुर्ग जिल्ह्यात हजेरी लावली. कणकवली, कुडाळ, सावंतवाडी, दोडामार्ग तालुक्यात रात्री साडे आठच्या सुमारास जोरदार पाऊस झाला.
विजांच्या कडकडाटासह आलेल्या पावसामुळे जिल्ह्यातील अनेक भागात वीजही गायब झाली. त्यामुळे नागरिकांची चांगलीच तारांबळ उडाली. पावसामुळे मुंबई-गोवा महामार्गाची वाहतुकीवरही परिणाम झाला.
दरम्यान सकाळपासून उकाड्याने त्रस्त असलेल्या नागरिकांना पावसामुळे काहीसा सुखद गारव्याचा आनंद लुटता आला. वादळी वाऱ्यासह आलेल्या पावसामुळे झाडांच्या फांद्या तुटल्याने काही भागात वीज पुरवठा खंडित करण्यात आला आहे.
दरम्यान भारतीय हवामान विभागाने मराठवाडा आणि विदर्भात तुरळक ठिकाणी गारपिटीसह पाऊस होण्याची शक्यता व्यक्त केली आहे.
स्कायमेटनं काल पश्चिम महाराष्ट्रात अवकाळी पावसाची शक्यता वर्तवली होती. त्यानंतर रात्री पुणे, सांगली आणि चिपळूणमध्ये अवकाळी पाऊस झाला.
पुण्यातील भोरमध्ये वादळी वाऱ्यासह पावसाच्या सरी बरसल्या. वादळी वाऱ्यामुळे अनेक ठिकाणी झाडं उन्मळून पडली. घरांचे पत्रे उडाले.
तिकडे चिपळूणमध्येही अवकाळी पावसाच्या सरी बरसल्या. तर सांगलीत ढगांच्या गडगडाट आणि विजांच्या कडकडाटासह पाऊस झाला.