उस्मानाबाद : मराठवाडा आणि विदर्भाला पावसाचा जोरदार तडाखा बसला आहे. उस्मानाबादेतल्या तुळजापूर तालुक्यातल्या 4 गावांना वादळी वाऱ्याचा तडाखा बसला. तर मराठवाडा आणि विदर्भात मिळून पावसाने सहा जणांचा जीव घेतला आहे.

पावसामुळे गावांचं मोठं नुकसान झालं असून तुळजापूर तालुक्यातल्या एकट्या अपसिंगा गावातील जवळपास 500 घरावरची पत्रे उडून गेले आहेत. तर लातूरमध्ये वीज पडून एका शेतकऱ्यासह तीन जनावरं दगावली आहेत. दुसरीकडे नांदेडमध्येही वीज पडून 16 वर्षीय तरुणाचा मृत्यू झाला.



या पावसाचा शेतीलाही मोठा फटका बसला आहे. आंबा आणि केळीच्या फळबागाही उद्ध्वस्त झाल्या आहेत. तर टोमॅटोचा खच होऊन मोठं नुकसान झालं आहे.

लातूर जिल्ह्यातील निलंगा शहरात जोरदार पाऊस झाला. हवामान खात्याने लातूर, सोलापूर, नांदेड आणि उस्मानाबाद भागात येत्या 24 तासात जोरदार पावसाची शक्यता वर्तवली आहे.

यवतमाळ जिल्ह्यातील महागाव, उमरखेड, यवतमाळ, दारव्हा, बोरी या भागात विजेच्या कडकडाटासह मुसळधार पाऊस झाला. महागाव तालुक्यात वीज कोसळून चौघांचा मृत्यू झाला आहे.