गोल्ड कोस्टहून आधी पुण्यात आणि मग तिथून तेजस्विनी कोल्हापुरात दाखल झाली.
तेजस्विनी आणि तिचे पती समीर दरेकर यांचं औक्षण करण्यात आलं. मग समीर दरेकर यांनी तेजस्विनीला मिठाई भरवून तिचं अभिनंदन केलं. त्यावेळी तेजस्विनीच्या आई सुनीता सावंतही उपस्थित होत्या.
तेजस्विनीने आपल्या कुटुंबीयाच्या आणि चाहत्यांच्या साक्षीने दोन्ही पदकांसह फोटोला पोज दिली.
त्यावेळी उपस्थितांनी टाळ्यांच्या कडकडाटात तिचं कौतुक केलं. कोल्हापूरच्या वर्षा नगर भागात फटाक्यांची आतषबाजी करत मोठा जल्लोष करण्यात आला. देशाला सुवर्ण पदक मिळवून देणाऱ्या तेजस्विनीच्या आगमनाने कोल्हापुरात आनंदाचं वातावरण आहे.
तेजस्विनीची चमकदार कारकीर्द
तेजस्विनी सावंतच्या आजवरच्या कारकीर्दीवर नजर टाकली तर तेजस्विनीनं 2006 आणि 2010 सालच्या राष्ट्रकुल क्रीडा स्पर्धांमध्ये दोन सुवर्ण, दोन रौप्य आणि एका कांस्यपदकाची लूट केली होती. 2009 साली म्युनिचच्या विश्वचषकात ती 50 मीटर्स रायफल थ्री पोझिशनच्या कांस्यपदकाची मानकरी ठरली होती. मग 2010 साली ती म्युनिचमध्येच 50 मीटर्स रायफल प्रोन नेमबाजीची वर्ल्ड चॅम्पियन झाली.
अर्जुन पुरस्काराची मानकरी
तेजस्विनी सावंतची 2006 ते 2010 या चार वर्षांमधली आंतरराष्ट्रीय कामगिरी खरोखरच कमालीची आहे. याच कामगिरीनं तिला 2011 साली केंद्र शासनाचा अर्जुन पुरस्कारही मिळवून दिला. त्यामुळं खरं तर यंदाच्या राष्ट्रकुल क्रीडा स्पर्धेत तेजस्विनीने मिळवलेल्या रुपेरी त्यानंतर सोनेरी यशाचं प्रथमदर्शनी आश्चर्य वाटणार नाही. पण तेजस्विनीचं आठ वर्षांनी वाढलेलं वय आणि तिची वैवाहिक जीवनातली वाढती व्यस्तता लक्षात घेतली, तर तिच्या कामगिरीला शाबासकी ही द्यावीच लागेल. तेजस्विनी आज 37 वर्षांची आहे. त्यामुळं अनेकांनी... झालं संपली हिचं करिअर म्हणून तिला निकालात काढलं होतं.
लग्नानंतरही यशाची परंपरा
तेजस्विनीच्या आई सुनीता सावंत यांना आपल्या लेकीच्या कॉमनवेल्थ गेम्समधल्या पदकांची तशी सवय जुनी आहे. पण तेजस्विनीनं लग्नानंतरही यशाची परंपरा कायम राखली म्हणून त्यांना जास्त अभिमान आहे.
संबंधित बातमी :