जळगाव जिल्ह्याच्या अनेक भागात दमदार पाऊस
पंधरा दिवसांच्या विश्रांतीनंतर जळगाव जिल्ह्यात काल रात्रीपासून अनेक भागात दमदार पाऊस झाल्याने शेतकऱ्यांना दिलासा मिळाला आहे. सुरुवातीला झालेल्या पावसानंतर शेतकऱ्यांनी पेरण्या केल्या होत्या. पीक उगवून आल्यानंतर पावसाने दडी मारल्याने शेतकऱ्यांच्या तोंडचे पाणी पळाले होते. अनेक भागातील पेरण्या पाण्याअभावी मोडण्याची वेळ आली असतानाच काल जिल्ह्याच्या अनेक भागात समाधानकारक पाऊस झाल्यानं पिकांना जीवदान मिळाल्याने शेतकऱ्यांनी समाधान व्यक्त केले आहे. काल एकाच रात्रीत जळगाव जिल्ह्यात 124 मिमी पावसाची नोंद करण्यात आली आहे. या पावसामुळे जळगाव शहराला पाणी पुरवठा करणाऱ्या वाघूर धरणातील जलसाठा हा एकाच रात्रीतून 12 टक्के हुन 20 टक्के वर जाऊन पोहोचला आहे. पारोळा तालुक्यातील तामसवाडी आणि पाचोरा तालुक्यातील बहूळा धरणात देखील मोठा जलसाठा झाल्याने पिण्याच्या पाण्याची समस्या कमी होण्यास मदत होणार आहे. सध्या झालेला पाऊस हा शेतीसाठी समाधान कारक पाऊस असला तरी अद्यापही अनेक जलसाठ्यांमध्ये कोणतीही वाढ झालेली नसल्याने मोठ्या पावसाची प्रतीक्षा कायम आहे.
धुळे जिल्ह्यात अनेक ठिकाणी बरसला वरुणराजा
धुळे जिल्ह्यात शेतातील पिकांना चुआ पद्धतीने म्हणजेच भांड्याभांड्यानं पाणी देऊन पिकं जगवण्याची धडपड शेतकरी करत आहेत. दुसरीकडे धरणांनी तळ गाठल्यानं पिण्याच्या पाण्याची स्थिती देखील गंभीर झाली आहे. जुलै महिन्याचा मध्यान्ह उलटून देखील पाऊस नसल्यानं सगळ्यांचे डोळे आभाळाकडे लागले होते. अखेरीस वरुण राजानं शनिवारी संपूर्ण धुळे जिल्ह्यावर जोरदार कृपादृष्टी केली. धुळे शहर, तालुक्यासह साक्री तालुका , तसेच शिरपूर , शिंदखेडा तालुक्यात जोरदार पाऊस झाला. रात्री उशिरापर्यंत जिल्ह्यात काही ठिकाणी पावसाचा जोर कायम होता. दरम्यान, पुढील 48 तासात धुळे जिल्ह्यात मुसळधार पावसाची शक्यता हवामान विभागातर्फे वर्तवण्यात आली आहे.
नाशिक जिल्ह्यातील मालेगाव, चांदवड, येवला तालुक्यात दमदार पाऊस
अनेक दिवसांच्या प्रतिक्षेनंतर काल दुपार नंतर नाशिक जिल्ह्यातील मालेगाव, चांदवड, येवला या तालुक्यात दमदार पावासने हजेरी लावल्याने दुष्काळाने होरपळेल्या बळीराजाला दिलासा मिळाला आहे. मालेगाव तालुक्यात सर्वात जास्त 92 मिमी पावसाची एकाच दिवसात नोंद झाली. मालेगाव लगतच्या दाभाडी, पिंपळगाव, जळगाव या भागात ढगफुटी सदृष्य पाऊस झाल्याने अनेक शेत पाण्याखाली गेली आहेत. येवला तालुक्यातील सायगाव येथील कोळगंगा नदीला प्रथमच पूर आला होता. या पावसामुळे विहिरींना पाणी उतरण्यास मदत तर होणारच आहे. शिवाय सुकून गेलेल्या पिकांना मोठ जीवदान मिळाले आहे.
अवघ्या काही तासांच्या पावसात उल्हासनगरात साचलं पाणी
गेले काही दिवस विश्रांती घेतलेल्या पावसानं आज दुपारच्या सुमारास ठाणे जिल्ह्यात जोरदार हजेरी लावली. या पावसानं उल्हासनगर, अंबरनाथ शहरातल्या सखल भागात पाणी साचलं. उल्हासनगरच्या मोरया नगरी, माणेरे गाव भागात दुकानं आणि घरांमध्ये पाणी साचलं. त्यातच इथल्या गटारावरील स्लॅब कोसळल्याने रहिवाशांना नाल्याचा मोठा धोका निर्माण झाला आहे. तर दुसरीकडे सुभाष टेकडी परिसरात तर रस्त्याला अक्षरशः एखाद्या ओढ्याचं स्वरूप आलं होतं. रहिवाशांच्या बैठ्या घरांमध्येही मोठ्या प्रमाणात पाणी शिरलं. तर दुसरीकडे अंबरनाथच्या वडवली मार्केट, गोसावी सोसायटीतही पाणी साचलं. त्यामुळं महापालिका आणि नगरपालिकेने नालेसफाई खरोखरच केली आहे का? अशी शंका नागरिकांनी उपस्थित केली आहे.
हिंगोलीतही रात्रीपासून रिमझिम पाऊस
हिंगोलीत रात्रीपासून रिमझिम पाऊस बरसत आहे. आज सकाळी काही वेळ पावसानं उघडीप घेतली होती. मात्र त्यानंतर काही भागात पुन्हा पावसाची रिपरिप सुरु झाली आहे. तब्बल महिनाभरानं आलेल्या पावसानं पिकांना जीवदान मिळालं आहे. शेतकऱ्यांनी पेरणी केल्यानंतर पावसानं ओढ दिली होती. मात्र आता पाऊस पडल्यानं शेतकऱ्यांमध्येही समाधानाचं वातावरण आहे.
नंदुरबार जिल्ह्यात पावसाची सर्वत्र हजेरी
नंदुरबार जिल्ह्यात अनेक दिवसांच्या प्रतीक्षेनंतर रात्रीपासून पावसाने सर्वत्र हजेरी लावली आहे. रात्रीपासून सकाळपर्यंत सर्वत्र समाधानकारक पाऊस झाल्याने शेतकऱ्यांवरील दुबार पेरणीचे संकट काहीअंशी टळले आहे. रात्री झालेल्या पावसामुळे नदी-नाले प्रवाहित झाले आहेत. नवापूर येथील रंगावली नदीला पाणी आल्याने शहराच्या पाणीपुरवठ्याचा प्रश्न मार्गी लागला आहे. मात्र अजूनही नंदुरबार जिल्ह्यात जोरदार पावसाची प्रतीक्षा कायम आहे.