धुळे/भिवंडी : राज्यभरातल्या अनेक भागात पावसाने दमदार हजेरी लावली आहे. धुळे, अहमदनगर, बीड, रत्नागिरी, सांगली, भिवंडीसह अनेक भागात मुसळधार पाऊस झाल्याने शेतकऱ्यांना दिलासा मिळाला आहे. या मुसळधार पावसात वीज कोसळून धुळ्यात दोन बालकांचा तर भिवंडीत एका महिलेचा मृत्यू झाल्याची घटना घडली आहे. या दोन घटनांमध्ये चार जण गंभीर जखमी झाले आहेत.
धुळे जिल्ह्यातील पाडळदे येथे झाडावर वीज कोसळून झाडाखाली थांबलेल्या 14 वर्षीय पंकज ज्ञानेश्वर राठोडचा मृत्यू झाला. तर सहा वर्षीय लखन दत्तात्रय राठोड, दहा वर्षीय हितेश संतोष राठोड हे दोन बालकं जखमी झाली आहेत. या घटनेत याच झाडाखाली असलेल्या म्हशीचा देखील वीज पडून मृत्यू झाला. तर धुळे जिल्ह्यातीलच शिंदखेडा तालुक्यातील खर्दे बुद्रुक येथील 15 वर्षीय दीपाली दगडू गिरासे या मुलीचा देखील वीज कोसळून मृत्यू झाला आहे.
भिवंडीत एक महिला मृत दोन जण गंभीर
भिवंडी तालुक्यातील वज्रेश्वरी रस्त्यावरील झिडके गावाच्या हद्दीतील उंबरपाडा या आदिवासी वस्तीच्या ठिकाणी सायंकाळच्या सुमारास वीज कोसळून शेतात काम करणारी एक महिला मृत झाली असून दोन जण गंभीर जखमी आहेत. त्यात एका लहान मुलाचा समावेश आहे. प्रमिला मंगल वाघे ( 20 ) असे मयत महिलेचे नाव आहे.
भिवंडी तालुक्यात काल सायंकाळी चार वाजता मुसळधार पाऊस सुरु झाला. यावेळी उंबरपाडा येथील भात लावणीचे काम करीत असताना वीज शेतात कोसळली. त्यामध्ये प्रमिला वाघे ( 20 ) ही महिला जागेवरच गतप्राण झाली. या घटनेत तिची आई अलका वाघे ( 52 ) आणि बहिणीचा मुलगा विजय अजय बोंगे ( 4 ) हे गंभीर जखमी झाले आहेत. जखमींना तात्काळ अंबाडी येथील साईदत्त या खाजगी रुग्णालयात उपचारासाठी दाखल करण्यात आले आहे. मयत प्रमिलाचा मृतदेह भिवंडी येथील स्व. इंदिरा गांधी स्मृती उपजिल्हा रुग्णालयात शवविच्छेदनासाठी हलविण्यात आला आहे. या प्रकरणी गणेशपुरी पोलिसांनी अपघाती मृत्युची नोंद केली आहे.
मुसळधार पावसात वीज कोसळून धुळ्यात दोन बालकांचा तर भिवंडीत एका महिलेचा मृत्यू
एबीपी माझा वेब टीम
Updated at:
21 Jul 2019 10:05 AM (IST)
या मुसळधार पावसात वीज कोसळून धुळ्यात दोन बालकांचा तर भिवंडीत एका महिलेचा मृत्यू झाल्याची घटना घडली आहे. या दोन घटनांमध्ये चार जण गंभीर जखमी झाले आहेत.
- - - - - - - - - Advertisement - - - - - - - - -