देवदर्शनाला गेलेल्या नवरदेवाचा अपघातात मृत्यू
एबीपी माझा वेब टीम | 09 May 2018 07:53 AM (IST)
अंबडजवळच्या खेड गावाजवळ बोलेरो आणि दुधाच्या गाडीची धडक होऊन,ही भीषण दुर्घटना घडली.
औरंगाबाद: औरंगाबाद-बीड रस्त्यावर भीषण अपघात झाला. लग्नानंतर देवदर्शनासाठी गेलेल्या नवरदेवाचा अपघातात मृत्यू झाला आहे. तर 6 ते 7 जण जखमी आहेत. अंबडजवळच्या खेड गावाजवळ बोलेरो आणि दुधाच्या गाडीची धडक होऊन,ही भीषण दुर्घटना घडली. या अपघातामुळे गोडसे कुटुंबीयांवर काळाचा घाला घातला. ही घटना आज पहाटे घडली. गोडसे कुटुंब देवदर्शनासाठी तुळजापूरला गेलं होतं. यावेळी स्वत: नवरदेव बोलेरो चालवत होता. देवदर्शन आटोपून ते औरंगाबादकडे परतत होते. तेव्हा आज पहाटे खेड गावाजवळ दुधाची गाडी आणि बोलेरोची धडक झाली. या अपघातात नवरदेवासह आणखी एकाचा मृत्यू झाला, तर कुटुंबातील 6-7 जण जखमी झाले आहेत. सर्व जखमींना औरंगाबादेतील घाटी रुग्णालयात हलवण्यात आलं आहे. लगीनघाईमुळे आनंदात असलेल्या गोडसे कुटुंबावर या दुर्दैवी अपघातामुळे दु:खाचा डोंगर कोसळला आहे.