अंबरनाथमध्ये वर्षभरापासून दूषित पाणीपुरवठा
एबीपी माझा वेब टीम | 08 May 2018 11:00 PM (IST)
अंबरनाथ शहरातल्या काही भागात गेल्या वर्षभरापासून दूषित पाण्याचा पुरवठा होतो
अंबरनाथ : अंबरनाथ शहरातल्या काही भागात गेल्या वर्षभरापासून दूषित पाण्याचा पुरवठा होतो आहे. या पाण्यात मोठ्या प्रमाणात गाळ सुद्धा आढळून येत आहे. त्यामुळे हे पाणी प्यायचं कसं? असा प्रश्न नागरिकांना पडला आहे. अंबरनाथ शहराच्या पूर्व भागात असलेल्या शिवाजीनगर, महालक्ष्मी नगर, कृष्णनगर भागात गेल्या वर्षभरापासून नळातून पिवळ्या आणि लालसर रंगाचं पाणी येत आहे. या समस्येबाबत अनेकदा पाणीपुरवठा विभागाकडे तक्रारी करुनही कोणत्याही उपाययोजना करण्यात आल्या नाहीत. शिवाय दूषित पाणी प्यायल्यानं रोगराई पसरण्याची भीतीही आहे. त्यामुळं आता थेट मिनरल वॉटर विकत घेण्याची वेळ नागरिकांवर आली आहे. एकीकडे पाण्याचं नियमित बिल भरुनही दूषित पाणी येतं, तर दुसरीकडे मिनरल वॉटरचाही खर्च होत अंबरनाथकर पुरते हैराण झाले आहेत.