पुणे : पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या मंत्रिमंडळात कर्तृत्त्ववान असं कुणीही नाही. मोदींनी मंत्रिमंडळ विस्तारात संघाला किंमत दिली नाही. बुलेट ट्रेनला विरोध केला म्हणूनच सुरेश प्रभू यांच्याकडून रेल्वे मंत्रालय काढून घेण्यात आलं, असा दावा माजी मुख्यमंत्री आणि काँग्रेस नेते पृथ्वीराज चव्हाण यांनी केला.


नागपुरात बोलतानाही पृथ्वीराज चव्हाण यांनी हा दावा केला होता. त्यानंतर पुण्यातही या वक्तव्याचा त्यांनी पुनरुच्चार केला. बुलेट ट्रेनचा निर्णय हा नोटाबंदी एवढाच वाईट असल्याचा आरोप पृथ्वीराज चव्हाण यांनी केला.

मोदींनी हिंदी भाषेचा वापर प्रभावीपणे केला. दुसरीकडे काँग्रेसचे नेते फॉरेन रिटर्न असल्यामुळे ते आधी इंग्रजीत विचार करतात मग हिंदीत बोलतात त्याचाही परिणाम दिसला. लोकांशी थेट संपर्क राहिला नाही, असंही पृथ्वीराज चव्हाण म्हणाले.

सरकार विरोधात समविचारी पक्षांनी एकत्र येण्याची गरज आहे, असं वक्तव्य राष्ट्रवादी काँग्रेसचे अध्यक्ष शरद पवार यांनी केलं होतं. या त्यांच्या मताशी पूर्णपणे सहमत आहे, असंही पृथ्वीराज चव्हाण यांनी सांगितलं.

गृह खातं स्वतःकडे ठेवून फडणवीसांनी शहाणपणाचा निर्णय घेतला

दरम्यान राज्याचं गृह खातं स्वतःकडे ठेवणाऱ्या मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी शहाणपणाचा निर्णय घेतला, असंही पृथ्वीराज चव्हाण म्हणाले. मुख्यमंत्री असताना मी गृहमंत्रीपद स्वतःकडे ठेवायला पाहिजे होतं. न ठेवल्याने त्याचा फटका बसला. गृहमंत्रीपद माझ्याकडे असतं तर खूप फरक दिसला असता, अशी खंतही त्यांनी बोलून दाखवली.