लातूर : लातूर-मुंबई एक्स्प्रेस बिदरपर्यंत सोडण्याच्या निर्णयाचा तीव्र विरोध सुरुच आहे. लातूर रेल्वे स्थानकावर पंढरपूर निजामाबाद एक्स्प्रेससमोर रेलरोको करण्यात आला.

रेल्वे बचाव कृती समितीच्या कार्यकर्त्यांनी आणि लातूरकरांनी हे आंदोलन पुकारलं. यावेळी सरकारविरोधात जोरदार घोषणाबाजीही करण्यात आली.

लातूर एक्स्प्रेस बिदरपर्यंत नेण्याचा निर्णय झाल्याने लातूरकरांनी त्याला विरोध केला आहे. या निर्णयामुळे लातूर एक्स्प्रेसचा फायदा उदगीर आणि बिदरच्या प्रवाशांना होणार आहे. पण उस्मानाबाद आणि लातूरच्या प्रवाशांची गैरसोय होणार आहे.

दरम्यान याप्रकरणी मराठवाड्यातील नेत्यांनी काल रेल्वेमंत्री सुरेश प्रभू यांची भेटही घेतली. मात्र यावर कोणताही तोडगा निघाला नाही. मात्र सुरेश प्रभू यांनी लातूरकरांसाठी नव्या ट्रेनची घोषणा केली आहे.

नव्या बिदर-मुंबई रेल्वेची घोषणा

या वादानंतर आता बिदर-मुंबई अशी नवी रेल्वे 1 जुलैपासून सुरु होणार आहे.

ही रेल्वे दररोज धावणार असून, लातूर,उस्मानाबाद, बिदर या तीनही भागांना समान कोटा राहणार आहे. शिवाय यशवंतपूर ते बिदर जाणारी रेल्वे लातूरपर्यंत वाढवण्यात येणार आहे.

इतकंच नाही तर लातूर- गुलबर्गा ही रेल्वे तीन आठवड्यांत सुरु होणार  आहे.

रेल्वे मंत्र्यांच्या भेटीत कोण काय म्हणालं? 

धनंजय मुंडे

मुंबई-लातूर रेल्वे बिदर ऐवजी परळी पर्यंत करावी, मुंबईसाठी परळीतून आणखी स्वतंत्र रेल्वे सुरु करावी,

परळी – बीड – नगर रेल्वे मार्गाचे काम नगरप्रमाणे परळीच्या बाजूनेही सुरु करावे अशी मागणी धनंजय मुंडे यांनी केली.

संभाजी पाटील निलंगेकर

मुंबई- लातूर रेल्वे ही लातूरपर्यंतच हवी, त्यानंतर हवं तर शटल सेवा पुण्यापर्यंत करा, अशी मागणी संभाजी पाटील निलंगेकर यांनी केली.

दक्षिणेतल्या यशवंतपूरपासून बिदरपर्यंतची ट्रेन उलट लातूरपर्यंत वाढवा, असंही त्यांनी नमूद केलं.

काय आहे लातूर एक्स्प्रेसचा वाद?

लातूर येथून सुटणारी लातूर-मुंबई एक्स्प्रेस बिदरहून सोडण्याचा निर्णय घेण्यात आला आहे. मात्र या गाडीत लातूरकरांनाच जागा मिळत नाही, तर बिदरहून सोडल्यानंतर आणखी प्रवाशांची भर पडेल, त्यामुळे लातूरकरांची आणि पुढच्या प्रवाशांची गैरसोय होईल, असं लातूरकरांचं म्हणणं आहे.

गाडी बिदरहून सोडण्याचा निर्णय मागे घेण्यासाठी लातूरकर आक्रमक झाले आहेत.

संबंधित बातम्या 

बिदरहून लातूर एक्स्प्रेस सोडल्याने वाद चिघळला


लातूर एक्सप्रेस बिदरहून सोडण्यास विरोध, लातूर-उस्मानाबादमध्ये बंद


लातूर एक्स्प्रेस: लातूरकरांची मागणी अमान्य, आता बिदर- मुंबई दररोज!