रायगड : रायगडच्या आपटा गावात एक वस्तीच्या एसटी बसमध्ये सापडलेली वस्तू बॉम्बच असल्याची माहिती सूत्रांनी दिली आहे. बॉम्बमध्ये तीन किलो युरिया पावडर असल्याचीही माहिती आहे. बॉम्ब निकामी करण्यात बॉम्बशोधक पथकाला यश आलं आहे. सध्या आपटा गावाला पोलिस छावणीचं स्वरुप प्राप्त झालं आहे.


पेण ते आपटा इथे जाणाऱ्या वस्ती एसटी बसमध्ये बुधवारी रात्री अकराच्या सुमारास बाँम्बसदृश्य वस्तू सापडली. यानंतर कंडक्टरने याची माहिती पोलिसांना दिली. मग अलिबाग इथून बॉम्ब शोध पथक आपटामध्ये दाखल झालं. सुमारे 4 ते 5 तासांनी पहाटे चारच्या सुमारास बॉम्ब निकामी करण्यात यश आलं.

रायगडमध्ये वस्तीच्या एसटी बसमध्ये सापडलेली बॉम्बसदृश वस्तू निकामी करण्यात यश

तीन किला युरिया, सर्किट, डेटोनेटर आणि बॅटरीने आयईडी बनवण्यात आलं होतं. हा बॉम्ब एसटीमध्ये घेऊन येणारा व्यक्ती कोण हे अद्याप समजू शकलेलं नाही. पोलिस पुढील तपास करत असून कंडक्टर आणि चालकाचा जबाब नोंदवणार आहेत.

पुलवामा हल्ल्यानंतर देशभरात अलर्ट जारी करण्यात आला आहे. त्याचवेळी एक वस्ती एसटीमध्ये बॉम्ब सापडल्याने खळबळ उडाली आहे. शिवाय बॉम्ब ठेवणाऱ्या व्यक्तीचाही शोध सुरु आहे.