शिर्डी : सातवा वेतन आयोग लागू करण्याच्या मागणीसाठी गेल्या 3 नोव्हेंबर पासून सुरू असलेले आंदोलन आता आक्रमक झाले आहे. काल पासून राहुरी कृषी विद्यापीठासह सगळ्या कृषी विद्यापीठातील अधिकारी व कर्मचाऱ्यांनी काम बंद आंदोलन सुरू केले. राहुरी कृषी विद्यापीठाच्या प्रमुख कार्यालयासमोर ठिय्या करत आज सरकारचा निषेध करण्यात आला असून सरकारने मागण्या पूर्ण करण्याची मागणी केलीय.


2018 पासून वारंवार मागणी करूनही सातवा वेतन आयोग न मिळाल्यानं राज्यातील सर्वच कृषी विद्यापीठात आंदोलन सुरू करण्यात आले आहे. सुरवातीला निषेध मोर्चा व नंतर सामूहिक रजा आंदोलन करण्यात आलं. मात्र सरकारने कुठलाही सकारात्मक प्रतिसाद न दिल्याने आता काम बंद आंदोलन सुरू करण्यात आलं असून आज राज्यमंत्री प्राजक्त तनपुरे यांनी आंदोलन स्थळी जात आंदोलकांची भेट घेतली. मात्र सरकार ठोस झालेल्या चर्चेत कुठलाही तोडगा निघाला नसून उद्या मंत्रिमंडळ बैठकीत हा मुद्दा मांडणार असल्याच तनपुरे यांनी सांगितलं आहे


गेल्या अनेक दिवसापासून आंदोलन सुरू असून भविष्यात असच आंदोलन सुरू राहील तर शेतकरी ही अडचणीत येण्याची शक्यता आहे. रब्बी हंगामाच्या तोंडावर सुरू असलेल्या या आंदोलना मुळे बी बियाणांची वाढती मागणी आहे त्यामुळे सरकार नेमकं काय भूमिका घेणार हे पाहणं महत्वाच आहे.


सातवा वेतन आयोग लागू करण्यात यावा या मागणीसाठी मागच्या अनेक दिवसांपासून विविध आंदोलने कृषी विद्यापीठीतील कर्मचारी ते शास्त्रज्ञांनी केले. आता राज्यातील चारही कृषी विद्यापीठातील कामगार ते शास्त्रज्ञांपर्यंत 7 हजारपेक्षा जास्त जणांनी आज सामूहिक रजा दिल्याने चारही कृषी विद्यापीठांचे कामकाज पूर्णपणे ठप्प झाले आहे. या मागण्यांसंदर्भात विद्यापीठाच्या समन्वय समितीचे शिष्टमंडळ कृषिमंत्री दादा भुसे, खासदार शरद पवार यांनाही भेटले, मात्र यातून तोडगा निघाला नाही.


कोविड काळातही कृषी विद्यापीठांचे कार्य सुरूच


राज्यातील कृषी क्षेत्राच्या विकासात महत्वाचे योगदान आहे. कोरोना काळात विद्यापीठ कर्मचाऱ्यांनी शेतकरी आणि कृषी क्षेत्रासाठी काम सुरूच ठेवले होते. इतर विद्यापीठांमध्ये परीक्षा घेणे, मोठा गोंधळ होत असतानाही चारही कृषी विद्यापीठात कोणताही गोंधळ न होता सर्व निकाल वेळेवर लावण्यात आले. सर्व विद्यार्थ्यांच्या ऑनलाईन क्लासेस वेळेवर होत आहेत. विद्यार्थ्यांचे भविष्य बघून त्यांची वेळेत परीक्षा घेऊन निकाल लावले.