Sanjay Raut : ठाकरे गटाचे खासदार संजय राऊत (Sanjay Raut) यांच्या वक्तव्यावर दोन दिवसांत चौकशी करणार असून पुढील बुधवारी हक्कभंग प्रकरणावर निर्णय देणार असल्याचं विधानसभा अध्यक्ष राहुल नार्वेकर यांनी सांगितलं आहे. तसेच, गोंधळामुळे सभागृहाची बैठक दिवसभरासाठी स्थगित करण्यात आली आहे. 

Continues below advertisement

राऊतांच्या वक्तव्यावरुन अधिवेशनाचा तिसरा दिवस गाजला

ठाकरे गटाचे खासदार संजय राऊत यांनी माध्यमांशी बोलताना विधीमंडळाचा 'चोर'मंडळ असा उल्लेख केला. राऊतांच्या याच वक्तव्यावरुन अर्थसंकल्पीय अधिवेशनाचा आजचा तिसरा दिवस गाजला. राऊतांविरोधात सत्ताधारी शिवसेना गट आणि भाजप आक्रमक झाल्याचं पाहायला मिळालं. तसेच, राऊतांविरोधात हक्कभंग आणण्याची मागणीही भाजप नेते अतुल भातखळकर यांनी केली. यावरुन विधीमंडळात गदारोळ झाला. यावर निर्णय देताना विधानसभा अध्यक्ष राहुल नार्वेकर यांनी त्यांचं मत वाचून दाखवलं. तसेच, दोन दिवसांत यासंदर्भात चौकशी करुन पुढील निर्णय बुधवारी जाहीर करु असं राहुल नार्वेकर यांनी निवेदनातून सांगितलं. त्यासोबतच निर्णय वाचून दाखवताना सभागृहाचा अवमान झाल्याची टिप्पणीही राहुल नार्वेकर यांनी केली. 

राहुल नार्वेकर यांनी राऊतांविरोधातील हक्कभंगाच्या प्रस्तावावर निर्णय दिल्यानंतरही सभागृहात गदारोळ सुरुच होता. सत्ताधारी आक्रमक झाल्याचं पाहायला मिळालं. एकंदरीतच संजय राऊतांविरोधात हक्कभंग प्रस्ताव आणण्यासाठी सत्ताधारी आग्रही दिसत आहेत. दुसरीकडे संजय राऊत यांनी कोल्हापुरात बोलत असताना आपल्या वक्तव्याचा पुनरुच्चार करत आपण आपल्या वक्तव्यावर ठाम असून त्या वक्तव्याबाबत त्यांनी स्पष्टीकरण दिलं आहे. 

Continues below advertisement

काय म्हणाले होते संजय राऊत? 

महाराष्ट्रात विधीमंडळ हे तर 'चोर'मंडळ, असं म्हणत संजय राऊतांनी शिंदे गट आणि भाजपवर थेट निशाणा साधला आहे. बनावट शिवसेनेने पदावरून काढलं तरी आम्ही पक्ष सोडणार नाही, असंही संजय राऊत यांनी बोलताना ठणकावून सांगितलं आहे. एकनाथ शिंदे म्हणतात बेळगाव प्रकरणी ते तुरुंगात गेले. त्यांनी त्याची कागदपत्रं दाखवावीत, असं आव्हानही ठाकरे गटाचे खासदार संजय राऊत यांनी केलं आहे. 

संसदेत पक्षनेतेपदावरुन काढून टाकण्यासंदर्भात बोलताना संजय राऊत म्हणाले की, "टाकू द्या. बनावट शिवसेना आहे, डुप्लिकेट. चोरांचं मंडळ... विधीमंडळ नाही 'चोर'मंडळ आहे. त्यांनी आम्हाला पदावरुन काढलं तरी आम्ही पक्ष सोडणार नाही. अशी अनेक पदं आम्हाला पक्षानं, बाळासाहेब ठाकरे आणि उद्धव ठाकरेंनी दिली. जी आम्ही ओवाळून टाकतो पक्षासाठी. आम्ही लफंगे नाही. पदं गेली तरी परत येतील, आमचा पक्ष महत्त्वाचा आहे."