मुंबई : राज्य सरकारने 34 हजार कोटींची कर्जमाफी केली असली, तरी शेतकरी नेते रघुनाथदादा पाटील यांनी नाराजी व्यक्त केली आहे. “कर्जमाफीच्या निर्णयाने आम्ही समाधानी नाही. शेतकऱ्यांच्या तोंडाला पाने पुसली आहेत.”, अशी टीका रघुनाथदादांनी सरकारवर केली आहे.

रघुनाथदादा काय म्हणाले?

सत्तेत आल्यानंतर शेतकऱ्यांचा सातबारा कोरा करु, असं आश्वासन या सरकारने दिलं होतं. या सर्वाची जबाबदारी सरकारने घेतली पाहिजे, असे रघुनाथदादा म्हणाले. शिवाय, शेतकऱ्यांना गाजर दाखवलं जात आहे. 90 टक्के शेतकऱ्यांचा सातबारा कोरा होणार, हे खोटं आहे, असा घणाघात त्यांनी केला.

“शेतकऱ्यांची संपूर्ण कर्जमुक्ती केलीच पाहिजे. राज्याची परिस्थिती आम्हाला माहित आहे. कर्जमुक्ती समाधानकारक नाही. तुटपुंजी मदत शेतकऱ्यांना नको”, असंही रघुनाथदादांनी ठणकावलं.

दरम्यान, राज्यातील शेतकऱ्यांचं सरसकट दीड लाख रुपयांपर्यंतचं कर्ज माफ करण्याची घोषणा राज्याचे मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी केली आहे. राज्य मंत्रिमंडळाच्या बैठकीत कर्जमाफीवर ऐतिहासिक निर्णय घेण्यात आला. ‘छत्रपती शिवाजी महाराज कृषी सन्मान योजना’ असं या कर्जमाफीला नाव देण्यात आले आहे.

संबंधित बातमी : शेतकऱ्यांना सरसकट दीड लाख रुपयांपर्यंत कर्जमाफी