मुंबई : राज्यातील शेतकऱ्यांच्या कर्जमाफीसाठी राज्य सरकारचा प्लान तयार झाला आहे. शेतकऱ्यांचं दीड लाखांपर्यंतचं कर्ज सरसकट माफ केलं जाणार आहे, अशी माहिती सूत्रांनी दिली आहे.

कर्जमाफीच्या मुद्द्यावर मंत्रालयात राज्य मंत्रिमंडळाची महत्त्वपूर्ण बैठक सुरु आहे. या बैठकीनंतर मुख्यमंत्री दीड लाखांपर्यंतची सरसकट कर्जमाफीची घोषणा करण्याची शक्यता आहे.

याचबरोबर, नियमित कर्ज भरणाऱ्या शेतकऱ्यांचा मुद्दाही नेहमीच चर्चेत राहिला आहे. त्यामुळे नियमित कर्ज भरणाऱ्यांना 25 हजार रुपयांच्या मदतीची घोषणाही राज्य सरकारकडून केली जाण्याची शक्यता आहे, अशीही माहिती सूत्रांनी दिली आहे.

राज्य सरकारने दीड लाखांपर्यंत कर्ज माफ करण्याची घोषणा केल्यास 92 लाख शेतकऱ्यांना याचा फायदा होणार आहे.

दरम्यान, सरकारने शेतकऱ्यांना 2 लाख रुपयांची सरसकट कर्जमाफी द्यावी, अशी मागणी शिवसेना पक्षप्रमुख उद्धव ठाकरे आणि खासदार राजू शेट्टी यांची आहे. शिवाय, नियमित कर्ज भरणाऱ्या शेतकऱ्यांना 25 हजार रुपयांऐवजी 50 हजार रुपये देण्याची मागणी केली आहे.