सांगली : “संप मोडित काढण्यासाठी मुख्यमंत्र्यांच्या सांगण्यावरुन राजू शेट्टी यांनी आत्मक्लेश यात्रा काढली. राजू शेट्टींची स्वाभिमानी शेतकरी संघटना म्हणजे नाव स्वाभिमानी आणि धंदे बेईमानी.”, असा घणाघात शेतकरी संघटनेचे नेते रघुनाथदादा पाटील यांनी केला. शिवाय, शेतकऱ्यांच्या आंदोलनामुळे उद्यापर्यंत सरकार हतबल झालेले दिसेल, असेही ते म्हणाले.
“शेतकऱ्यांचा हा संप होऊ नये म्हणून मुख्यमंत्र्यांच्या सांगण्यावरुनच खासदार राजू शेट्टी यांनी आत्मक्लेश यात्रा काढली होती आणि ती संपवताना 20 तारखेपर्यंत अल्टीमेटम दिला आहे.” असा आरोप रघुनाथदादा पाटील आंनी खासदार राजू शेट्टी यांच्यावर केला.
आत्मक्लेश करायचाच होता, तर या संपात सहभागी होऊन राजू शेट्टींनी करायला हवा होता, असे म्हणत रघुनाथदादा पाटील यांनी राजू शेट्टी आणि सदाभाऊंवर निशाणा साधला.
स्वाभिमानी शेतकरी संघटना म्हणजे नाव स्वाभीमानी आणि धंदे बेईमानी, असे ते म्हणाले.
“सरकारची शेतकऱ्यांबद्दलची भूमिका पाहता शेतकऱ्यांच्या भावनांचा कडेलोट होणारच होता. मात्र, पहिल्याच दिवशी या आंदोलनाला राज्यभरातून इतका मोठा प्रतिसाद मिळतो ही मोठी गोष्ट आहे.”, असे रघुनाथदादा म्हणाले.