रेल्वे ही सर्व्हिस तिला द्यायला तयार नसल्यानं शेवटी इंडियन पोस्टल अँड कम्युनिकेशन ही दुसरी पोस्ट तिला देण्यात आली होती. प्रांजलची जिद्द एवढी मोठी की, तिनं यंदा थेट 124 वी रँक प्राप्त केली आहे. त्यामुळे आता तिला आयएएस बनण्यापासून कुणी रोखू शकणार नाही.
प्रांजल डोळ्यांनी पूर्णपणे अंध आहे, पण प्रशासकीय व्यवस्थेचे डोळे उघडण्याचं काम तिच्या यशानं केलंय. अंध असल्याचं कारण दाखवून जी व्यवस्था तिला तिच्या हक्काची पोस्ट देत नव्हती, त्यांच्या नाकावर टिच्चून तिनं पुन्हा यूपीएससीत घवघवीत यश मिळवलंय.
यावर्षी देशात 124 व्या क्रमाकांनी ती यूपीएससी उत्तीर्ण झालीय. खरंतर मागच्या वर्षीही पहिल्याच प्रयत्नात तिनं यूपीएससीत यश संपादन केलं होतं. 773 व्या क्रमाकांनुसार तिला रेल्वे अकाऊंट सर्विस देण्यात आली होती. मात्र तिच्या अंधपणाचं कारण सांगत रेल्वेनं तिला ताटकळत ठेवलं.
27 वर्षांची प्रांजल ही मूळची जळगावची. व्यवस्थेच्या अंसेदवनशीलतेचा अनुभव घेत असतानाही प्रांजल नाऊमेद झाली नाही. एकीकडे रेल्वे मंत्रालयात आपल्या हक्कासाठी चकरा माराव्या लागत असतानाच दुसरीकडे परीक्षेचीही चालू ठेवत तिनं ही लढाई जिंकलीय.
आपल्या शारिरीक कमतरतांवर मात करत अनेक दिव्यांग यूपीएससीचं शिखर पार करतात. पण बुद्धिमतेची चुणूक दाखवल्यानंतरही त्यांना हक्काच्या पोस्टसाठी झगडावं लागणं हे दुर्दैव आहे. वयाच्या 7 व्या वर्षी एका अपघातात प्रांजलनं आपली दृष्टी गमावली. मात्र हे संकटही तिच्या ध्येयाच्या आड येऊ शकलं नाही.
सुरुवातीला ब्रेल लिपीतून शिक्षण घेतल्यानंतर तिनं मुंबईच्या सेंट झेविअर्समध्ये राज्यशास्त्र विषयात बीएचं शिक्षण घेतलं. नंतर एमए करण्यासाठी ती जेएनयूत दाखल झाली. या सगळ्या शैक्षणिक प्रवासात तिचा प्रथम क्रमांक कायम होता. अभ्यास करायचा म्हटला की आपण पुस्तक हातात घेऊन वाचायला सुरुवात करतो. प्रांजलला ते शक्य नाही हे लक्षात घेतल्यावर तुमच्या लक्षात येईल की तिचं यश किती मोठं आहे.
क्लास इज परमनंट...नाणं खणखणीत असलं की ते कुठेही असलं तरी वाजल्याशिवाय राहत नाहीच. प्रांजलच्या यशानं याचीच चुणूक दाखवलीय. अपंगत्वावर मात करत तिनं मिळवलेल्या यशाचा मान राखण्याची बुद्धी मागच्या वेळी रेल्वे खात्याला झाली नाही. पण नव्या जिद्दीनं तिनं ध्रुवपद पटकावलंय. तिच्या या यशानं असंवेदनशील व्यवस्थेच्या डोळ्यात झणझणीत अंजन घालण्याचं काम केलंय.