यवतमाळ : यवतमाळ येथील वसंतराव नाईक शासकीय वैद्यकीय महाविद्यालयात रॅगिंगचा प्रकार उघडकीस आला आहे. एमबीबीएस द्वितीय वर्षाच्या विद्यार्थ्याला सहा तास गुडघ्यावर बसवून वरिष्ठ विद्यार्थ्यांनी मारहाण केल्याचा धक्कादायक प्रकार पुढे आला आहे.
रमेश (नाव बदलले आहे) या विद्यार्थाने 8 ऑगस्ट रोजी मेडिकल कॉलेजच्या वसतिगृहात प्रवेश घेतला. पहिल्या दिवसापासूनच वरिष्ठ विद्यार्थ्यांकडून रमेशला त्रास दिला जात होता. 12 ऑगस्टला मनीष वासेकर, प्रतिक चव्हाण, बालाजी श्रीरामे, प्रशांत तुरपटवार, शंतनू ढोकणे, मिलिंद गरपिंडे या सहा जणांनी रमेशला 6 तासा गुडघ्यावर बसायला भाग पाडले. यापैकी तिघांनी 13 ऑगस्टला रमेशला दुपारी वसतिगृहाच्या रुम नंबर 25 मध्ये बोलावून पुन्हा मारहाण केली. रमेशने या विद्यार्थ्यांपासून कशीबशी सुटका करुन घेतली आणि थेट चंद्रपूर जिल्ह्यातील आपलं मूळ गाव गाठलं.
पाच दिवसांनंतर प्रकृतीत सुधारणा झाल्यावर रमेश आपल्या आई-वडिलांना घेऊन कॉलेजमध्ये आला. त्याच्या आईने रॅगिंबाबत कॉलेजचे अधिष्ठाता डॉ. अशोक राठोड यांच्याकडे तक्रार दिली.
धक्कादायक म्हणजे याच कॉलेजमध्ये अनेक विद्यार्थ्यांसोबत याआधीही रॅगिंगसारखा प्रकार घडला आहे. संबंधित विद्यार्थी भीतीपोटी तक्रार देत नाहीत.
मला तब्बल सहा तास वसतिगृहाच्या छतावर गुडघ्यावर बसवून ठेवले आणि अमानुष मारहाण पण केली, असे रमेशने सांगितले.
रॅगिंगबाबत तक्रार आम्हला प्राप्त झाली असून महाविद्यालयातील अँटी-रॅगिंग कमिटीने तक्रार गांभिर्याने घेऊन संबंधित विद्यार्थ्यांची चौकशी करुन कडक कारवाई करणार असल्याचे समितीचे अध्यक्ष डॉ. प्रभाकर हिवरकर यांनी सांगितले.
रॅगिंग हा गंभीर प्रकार असून त्याची दखल घेऊन आता वसंतराव नाईक शासकीय वैद्यकीय महाविद्यालयातील कमिटी समितीच्या तपासात आणखी काय समोर येते, हे पाहणे महत्त्वचे ठरणार आहे. त्यानंतरच पोलिसात हे प्रकरण जाणार आहे ऐकूनच विद्यार्थ्यांना रॅगिंगसंदर्भात जागरुक करणे महत्वाचे आहे.
विद्यार्थ्याला 6 तास गुडघ्यावर बसवून मारहाण, यवतमाळमधील मेडिकल कॉलेजमध्ये रॅगिंग
एबीपी माझा वेब टीम
Updated at:
19 Aug 2017 03:28 PM (IST)
यवतमाळ येथील वसंतराव नाईक शासकीय वैद्यकीय महाविद्यालयात एमबीबीएस द्वितीय वर्षाच्या विद्यार्थ्याची रॅगिंग
- - - - - - - - - Advertisement - - - - - - - - -