नागपूर : नागपूरसह विदर्भातल्या अनेक जिल्ह्यांत पावसानं हजेरी लावलीय. गेल्या 24 तासात नागपुरात 141.9 मिमी पावसाची नोंद झाली आहे. रात्रभर बरसलेल्या पावसामुळं हावेत थोडाफार गारवा निर्माण झाला असला तरी, बळीराजा मुसळधार पावसाच्या प्रतीक्षेत आहे.
पावसाळा अर्धा उरकला तरी विदर्भातल्या अनेक जिल्ह्यांत पावसानं पुनरागमन केलं नव्हतं, पण अखेर पावसाच्या सरींनी बरसायला सुरुवात केलीय. नागपुरात गेल्या 24 तासांत 141.9 मिमी पावसाची नोंद झालीय. तर विदर्भातल्या अमरावती, वर्धा, भंडारा, यवतमाळ, गोंदिया, अकोलामध्ये पावसानं चांगली हजेरी लावलीय.
नागपुरातल्या नरेंद्रनगर भागात पावसाचं पाणी साचल्यानं वाहतूक वळवण्यात आली आहे.
दुसरीकडे, बुलडाणा जिल्ह्यातल्या अनेक ठिकाणी पाऊस झाला असला तरी बळीराजा मुसळधार पावसाच्या प्रतिक्षेत आहे. जेणेकरुन शेतीची कामं, आणि पिकं उभी राहण्यासाठी मदत होईल.
जिल्ह्यातली बहुतेक सर्वच धरणं कोरडी पडली असून धरणं ही जोरदार पावसाच्या प्रतीक्षेत आहे. पाऊस नसल्यानं पिकांनी मान टाकायला सुरुवात केलीय, तर ठिकठिकाणी बळीराजाही पिकांवर नांगर फिरवतोय, त्यामुळे आता तरी पावसाच्या जोरदार सरी बरसू देत आणि शिवार फुलू दे अशी साद बळीराजा वरुणराजाला देतोय.