नागपूर : समृद्धी महामार्गाचे व्यवस्थापकीय संचालक म्हणूम राधेश्याम मोपलवार यांना ठाकरे सरकारकडूनही पसंती मिळाली आहे. पुन्हा एकदा त्यांची या पदावर नेमण्यात आले आहे. फडणवीस सरकारच्या काळात एका वर्षासाठी राधेश्याम मोपलवार यांची नियुक्ती झाली होती. त्यानंतर त्यांच्या कामामुळे त्यांना मुदतवाढ मिळत गेली. आता नवं सरकार आल्यानंतर मोपलवार यांची मुदत संपत असताना नव्या सरकारने म्हणजेच ठाकरे सरकारनेसुद्धा मोपलवारांनाच पसंती दिली आहे आणि तीन महिन्याच्या कालावधीसाठी राधेश्याम मोपलवार यांना करार पद्धतीने मुदतवाढ दिली आहे. या मुदतवाढीमुळे मोपलवारांचा कार्यकाळ 31 मे 2029 पर्यंतचा असेल.


देवेंद्र फडणवीसांच्या काळातील अनेक योजनांना स्थगिती देणाऱ्या, निर्णय फिरवणाऱ्या ठाकरे सरकारने मोपलवारांना पसंती दिली आहे. ठाकरे सरकार फडणवीस सरकारांचे प्रकल्प आणि बरेच निर्णय बदलत असल्याचा ठाकरे सरकारवर आरोप केला जात होता मात्र कुठल्याही प्रकल्पाला आम्ही स्थगिती देत नाही असं स्पष्ट केलं होतं. समृद्धी प्रकल्पाच्या क्लिष्ट बाबींचे सुयोग्य नियोजन करून त्या मार्गी लावण्याचे प्रकल्पासाठी विविध वित्तीय संस्थांच्या मदतीने निधी उभारण्याची जबाबदारी राधेश्याम मोपलवार यांच्यावर देण्यात आली आहे. त्यामुळे मोपलवार पुढच्या तीन महिन्यांसाठी महाराष्ट्र राज्य रस्ते विकास महामंडळाच्या माध्यमातून सुरू असलेल्या बाळासाहेब ठाकरे समृद्धी महामार्गाचं काम पाहणार आहेत. सोबतच वर्सोवा, वांद्रे सी-लिंक प्रकल्प, मुंबई-पुणे द्रुतगती मार्गावरील मिसिंग लिंक असेही प्रकल्प त्यांच्या ताब्यात असणार आहेत.



समृद्धी महामार्गाला बाळासाहेब ठाकरेंचं नाव दिलं जाईल, मंत्रीमंडळ बैठकीत प्रस्ताव; एकनाथ शिंदेंची माहिती | ABP Majha




कसा असेल समृद्धी महामार्ग?

नागपूर-मुंबई समृद्धी महामार्ग हा मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांचा महत्वकांक्षी प्रकल्प आहे. 701 किमी लांबीच्या नागपूर-मुंबई समृद्धी महामार्गाच्या उभारणीसाठी या द्रुतगती महामार्गाची 16 भागांत विभागणी करण्यात आली आहे. जवळपास 50 हजार कोटी रुपये खर्च अपेक्षित असलेला महाराष्ट्र समृद्धी महामार्ग दहा जिल्हे, 26 तालुके आणि 392 गावांना जोडणार आहे. कृषी, औद्योगिक, आरोग्य, शिक्षण, बांधकाम, पर्यटन यांसारख्या क्षेत्रांना चालना देऊन त्यायोगे मोठ्या प्रमाणात रोजगाराच्या संधी उपलब्ध करून देणारा महाराष्ट्र समृद्धी महामार्ग भविष्यात राज्याच्या आर्थिक विकासात महत्त्वाचा प्रकल्प ठरेल असा फडणीस सरकारला विश्वास आहे. नागपूर आणि मुंबई या दोन शहरांमधील प्रवासाचा वेळही या महामार्गामुळे निम्म्यावर येणार आहे. आंतरराष्ट्रीय रस्ता परिषदेच्या (आयआरसी) नियमांनुसार या महामार्गाची उभारणी करण्यात येणार आहे.

VIDEO | समृद्धी महामार्गाचं काम युद्धपातळीवर, ड्रोनच्या माध्यमातून आढावा | मुंबई | एबीपी माझा



वांद्रे ते वर्सोवा सागरी मार्ग


वांद्रे ते वर्सोवा हा सागरी सेतू सध्याच्या वांद्रे-वरळी समुद्र सेतूच्या तीन पटीने जास्त लांब असणार आहे. या नवीन सागरी सेतूपासून पश्चिम दृतगती मार्गाला जोडणारी वाहतूक व्यवस्था करण्यात येणार आहे. तसेच वांद्रे बस स्थानकावरुन जोडणारा नवीन रस्ता पश्चिम दृतगती मार्गावरुन (पार्ले जंक्शन) वर्सोवा नाना नानी पार्क येथे सागरी सेतूला जोडणारा रस्ता विकसित करण्यात येणार आहे.


मुंबई-पुणे द्रुतगती महामार्गावरील नवीन मार्गिका


खोपोली ते खंडाळा या घाट लांबीतील नवीन मार्गिकेचे (Missing Link) बांधकाम करण्यात येणार आहे. खालापूर टोलनाक्यापासून कुसगाव (सिंहगड इन्स्टिट्यूट) येथे निघणारा दोन टप्प्यातील बोगद्यांचे आणि त्यांना जोडणाऱ्या आधुनिक पुलाचे बांधकाम करण्याला मंजुरी देण्यात आली. या प्रकल्पातील दोन बोगद्यांची एकूण लांबी 11 किमी असून दोन डोंगरामधील पुलांची लांबी दोन किमी आहे. देशातील सर्वात मोठा असा 650 मीटरचा केबल स्टेड पूल पर्यटकांसाठी आकर्षण असणार आहे. यामुळे पुणे-मुंबई मार्गावरील वाहतुकीचे अंतर कमी होऊन वेळेची बचत होण्यास मदत होणार आहे.


Samruddhi Mahamarg | समृद्धी महामार्गात अधिकाऱ्यांनी जमिनी लाटल्या; पृथ्वीराज चव्हाणांचा आरोप