मुंबई : मुंबई पोलिसांच्या गुन्हे शाखेकडून धडाकेबाज कारवाया सुरूच असून अंडरवर्ल्डचं कंबरडे मोडण्यासाठी पोलीस प्रयत्न करत आहेत. गँगस्टर एजाज लकडावाला याला अटक केल्यानंतर मुंबईतल्या त्याच्या हस्तकांनासुद्धा बेड्या ठोकण्यात आल्या आहेत तर आता लकडावला याच्या कुटुंबियामधील खंडणी प्रकरणात कनेक्शन असल्याचं उघडकीस आलं आहे. एजाज लकडावाला याचा आतेभाऊ नदीम लकडावाला याने अनेक खंडणी प्रकरणात लकडावालाची मदत केली असल्याचे समोर आली आणि त्याच्याविरोधात लुक आऊट नोटीस बजवण्यात आली होती. रविवारी नदीम लकडावाला याला मुंबई पोलिसांच्या खंडणी विरोधी विभागाने मुंबई विमानतळावर पथकाने बेड्या ठोकल्या आहेत.


गँगस्टर एजाज लकडावाला याला अटक केल्यानंतर लकडावाला याच्या संपर्कात असलेल्या त्याच्या हस्तकांना सुद्धा वेगवेगळ्या गुन्ह्यात अटक करण्यात आली आहे. यामध्ये गँगस्टर तारिक परवीन, गँगस्टर सलीम महाराज हे सुद्धा सध्या खंडणी विरोधी पथकाच्या ताब्यात आहेत. खार मधल्या एका व्यावसायिकाला धमकी देऊन एक कोटी रुपयांची खंडणी मागितल्याप्रकरणी एजाज लकडावाला याच्यावर गुन्हा दाखल करण्यात आला होता. त्यानुसार त्याला काही दिवसांपूर्वीच बिहारमधून मुंबई पोलिसांनी अटक केलेली आहे. मात्र खारमधील व्यावसायिकाची माहिती आरोपी नदीमने गँगस्टर एजाज लकडावाला याला पुरवली असल्याची माहिती लकडावाला याच्या चौकशीत निष्पन्न झाली होती.

आरोपी नदीम लकडावाला याचा खंडणी प्रकरणात सहभाग निष्पन्न झाल्यानंतर त्याच्याविरोधात लुक आऊट नोटीस बजावण्यात आली होती. नदीम देशाबाहेर पळाल्याने त्याला ताब्यात घेण्यासाठी मुंबई पोलीस प्रयत्न करत होते. रविवारी (1 मार्च) आरोपी नदीम हा सौदी अरेबिया मधून मुंबई विमानतळावर आला आणि त्याआधीच मिळालेल्या माहितीनुसार मुंबई खंडणी विरोधी पथकाकडून अटक करण्यात आली आहे. आरोपी नदीम याने याआधी अनेक प्रकरणात व्यवसायीकांची माहिती एजाज लकडावला याला पुरवली असल्याची शक्यता खंडणी विरोधी पथकाकडून व्यक्त करण्यात आली आहे.

Gangster Ejaj Lakdawala | दाऊदचा एकेकाळचा हस्तक एजाज लकडावाला अटकेत | स्पेशल रिपोर्ट | ABP Majha


गेल्यावर्षीच अंडरवर्ल्ड डॉन दाऊद इब्राहिमचा पुतण्या रिझवान कासकर यालासुद्धा मुंबई पोलिसांच्या गुन्हे शाखेने बेड्या ठोकल्या होत्या. त्यामुळे या गँगस्टर लोकांना त्याच्या कुटुंबियातीलच काही सदस्य आतापर्यंत मदत असल्याचे निष्पन्न झालं आहे. नदीम लकडावाला याला कोर्टात हजर करण्यात आले असून उद्यापर्यंत त्याला पोलीस कोठडी सुनावण्यात आली आहे. या प्रकरणात मुंबई पोलिसांचे खंडणी विरोधी पथक अधिक तपास करत आहे.