मुंबई : काँग्रेसला सोडचिठ्ठी दिल्यानंतर अखेर राधाकृष्ण विखे पाटील यांच्या भाजप प्रवेशाचा मुहूर्त ठरला आहे. येत्या 10 किंवा 11 जून रोजी विखे पाटील भाजपात प्रवेश करण्याची शक्यता आहे. मात्र यावेळी ते एकटेच भाजपमध्ये प्रवेश करतील अशी माहिती सूत्रांकडून मिळते आहे. राधाकृष्ण विखे पाटील यांच्यासोबत भाजपमध्ये प्रवेश करणाऱ्या बंडखोर आमदारांना जागावाटपात स्थान मिळणार का आणि शिवसेना त्यांना जागा सोडणार का हा प्रश्न अद्याप गुलदस्त्यात आहे. भाजपकडूनही अद्याप कोणतीही भूमिका स्पष्ट करण्यात आलेली नाही.

राधाकृष्ण  विखेंच्या राजीनाम्यासह आज सुरुवात झाली आहे. ते आमच्या दिशेने निघालेत. पोहोचले की घेऊन टाकू अशा शब्दात रावसाहेब दानवेंनी विखे पाटलांवर भाष्य केलं. आमच्या पक्षात येण्यासाठी जागेची कमिटमेंट आम्ही कोणालाही करणार नाही. जो येईल त्याचं स्वागत करु असं म्हणत विखेंना कोणती जबाबदारी दिली जाईल किंवा कोणतं पद दिलं जाईल याबाबत सूचक मौन बाळगलं आहे.



भाजप हा पक्ष खूप मोठा आहे. यात कर्नाटकचे मुख्यमंत्री ही आले आहेत. त्यांनाही पक्षाने सामावून घेतलं आहे असं दानवे पुढे म्हणाले आहेत. पक्षात आलेल्या कार्यकर्त्याला काय जबाबदारी द्यायची हे आम्ही नक्की करु आणि त्यांना सामावून घेऊ असंही दानवेंनी स्पष्ट केलं आहे.

विखेंचा काँग्रेस आमदारकीचा राजीनामा

राधाकृष्ण विखे पाटील यांनी विधानसभा अध्यक्षांची भेट घेत आमदारकीचा राजीनामा दिला. विखेंनी यापूर्वीच विधानसभा विरोधी पक्षनेतेपदाचाही राजीनामा दिला होता. राजीनामा दिल्यानंतर विखेंनी आज गिरीश महाजन यांची भेट घेतली. तसंच मुख्यमंत्र्यांची भेट घेतल्याचीही विखेंनी सांगितलं. यावेळी बोलताना आपल्यासोबत कुणीही आमदार येणार नसल्याचं विखेंनी स्पष्ट केलं. तसंच सर्व आमदार त्यांच्या निर्णय घेण्यास सक्षम असल्याचं सूचक विधानही त्यांनी केलं आहे.

चंद्रकांत पाटलांची दिल्लीवारी

भाजपचे राज्यातील ज्येष्ठ नेते चंद्रकांत पाटील आज दिल्लीत दाखल झाले आहेत. राज्यात राजकीय घडामोडींना वेग आला असताना पाटील यांच्या दिल्लीवारीला महत्व आहे. भाजपमध्ये होत असलेलं इनकमिंग, मंत्रिमंडळ विस्तार, नवे प्रदेशाध्यक्ष, मुंबई भाजप अध्यक्ष यांच्या निवडीबद्दल राज्यात चर्चा सुरु आहे.

दरम्यान आजच्या मंत्रिमंडळ बैठकीलाही चंद्रकांत पाटील अनुपस्थित होते. मात्र चंद्रकांत पाटील आज काही घरगुती सभारंभासाठी दिल्लीत गेले असल्याची निकटवर्तीयांनी माहिती दिली आहे.