अहमदनगर : विधानपरिषद पोटनिवडणुकीत भाजपचे उमेदवार प्रसाद लाड यांनी तब्बल 209 मतं मिळवत काँग्रेस-राष्ट्रवादी आघाडीचे उमेदवार दिलीप माने यांचा पराभव केला. पण याचवेळी 9 मतं फुटल्याची माहिती समोर आल्यानं ते नऊ जण नेमके कोण? याबाबत आता चर्चांना उधाण आलं आहे. याचवेळी विधानसभेचे विरोधी नेते राधाकृष्ण विखे-पाटील यांनी काँग्रेसची मतं फुटली नसल्याचा दावा केला आहे.


राधाकृष्ण विखे-पाटलांचा नेमका दावा का?

‘विधानपरिषद पोटनिवडणुकीत मतं फुटली हे दुर्दैव आहे. पण काँग्रेसची मतं फुटली नसल्याची मला खात्री आहे. मात्र, फुटलेल्या दोन मतदारांनी अगोदरच काँग्रेसमधून बाहेर पडण्याचा निर्णय घेतला आहे. पण पक्षात असेपर्यंत त्यांनी पक्षाचा आदेश पाळायला हवा होता. या संदर्भात अहवाल आल्यावर त्यांच्यावर पक्षीय स्तरावर कारवाई होईल.’ असा दावा विखे-पाटील यांनी केला आहे.

दरम्यान पक्षाला दगा देणारे आमदार कोण? याची काँग्रेस आणि राष्ट्रवादीच्या गोटात जोरदार चर्चा सुरु आहे.

प्रसाद लाड जिंकले, आघाडीची 9 मतंही फोडली!

नारायण राणे समर्थक कालिदास कोळंबकरांनी काँग्रेसच्या उमेदवाराला मतदान न केल्याचं उघडपणे जाहीर केलं. दरम्यान राष्ट्रवादी काँग्रेसचे आमदार छगन भुजबळ आणि शिवसेनेचे आमदार आणि विद्यमान ‘पदुम’ राज्यमंत्री अर्जुन खोतकरांना मतदान करता आलं नाही.

तर एमआयएमचे आमदार वारिस पठाण आणि इम्तियाज जलील यांनी मतदान केलं नाही.

राज्यात पहिल्यांदाच विधान परिषदेच्या निवडणुकीसाठी नोटाचा पर्याय वापरण्यात आला होता.

विधानपरिषद निवडणूक निकाल

  • प्रसाद लाड (भाजप)- 209 मतं

  • दिलीप माने (काँग्रेस)- 73 मतं


दोन मतं बाद- 2

  • छगन भुजबळ



  • अर्जुन खोतकर


विधानपरिषद निवडणुकीचं गणित

  • एकूण आमदार – 288



  • भुजबळ, अर्जुन खोतकर आणि MIM च्या 2 आमदारांचं मतदान नाही



  • म्हणजेच उरले 284



  • त्यापैकी प्रसाद लाड यांना 209 मतं, तर दिलीप माने यांना 73 मतं मिळाली



  • काँग्रेस (42)-राष्ट्रवादीचं (41) संख्याबळ पाहता, दिलीप माने यांना 83 – 1 (भुजबळ) = 82 मतं अपेक्षित होती



  • मात्र त्यांना 73 मतं मिळाली, म्हणजेच काँग्रेस-राष्ट्रवादीची 9 मतं फुटली.


प्रसाद लाड यांचं बलाबल
भाजप – 122
शिवसेना – 63
अपक्ष – 7
एकूण – 192

पण आमदारकी रद्द झाल्याने अर्जुन खोतकर यांनी मतदानाचा हक्क गमावला. त्यामुळे भाजप-शिवसेना युतीची एकूण 191 मतं प्रसाद लाड यांना पडणं अपेक्षित होतं. मात्र त्यांना 209 मतं मिळाली.

दिलीप माने यांचं बलाबल

काँग्रेस – 42
राष्ट्रवादी – 41
एकूण – 83

राष्ट्रवादी काँग्रेसचे छगन भुजबळ तुरुंगात असल्याने त्यांना मतदान करता आलं नाही. मात्र रमेश कदम हे तुरुंगातून मतदानासाठी आले होते. त्यामुळे दिलीप माने यांना किमान 82 मतं मिळणं अपेक्षित होतं. मात्र त्यांना 73 मतं मिळाली. म्हणजेच काँग्रेस-राष्ट्रवादी आघाडीची 9 मतं फुटली.

संबंधित बातम्या :

प्रसाद लाड जिंकले, आघाडीची 9 मतंही फोडली!

विधानपरिषद पोटनिवडणुकीत युतीच्या प्रसाद लाड यांची बाजी

भाजप उमेदवार प्रसाद लाड यांची नेमकी संपत्ती किती?


संपूर्ण घटनाक्रम : … आणि प्रसाद लाड यांच्या नावाची घोषणा झाली!


विधानपरिषद पोटनिवडणूक : राणेंचा पत्ता कट, प्रसाद लाड यांना उमेदवारी


काँग्रेसचे विधानपरिषद उमेदवार दिलीप माने यांच्याविरोधात गुन्हा