रत्नागिरी: एक गाव... पाण्यानं वेढलेलं... लोकसंख्या 77... आणि मतदार 71.... ग्रामपंचायतीच्या स्थापनेपासून गावानं कधी निवडणूक पाहिली नाही. अर्थात हे गाव म्हणजे एक  बेटच आहे.

रत्नागिरीच्या जैतापूरजवळ धाऊलवल्लीजवळचं जुवे बेट.

चमचमणारं पाणी. नारळी-पोफळीच्या बागा. मधोमध भुई... आणि चारी दिशांना पाणी... पाणी... आणि पाणी...

राजापूरची अर्जुना नदी अर्धचंद्राकृती आकार जिथे घेत तिथेच हा स्वर्ग उभा आहे. कांदळवनाच्या भूलभुलय्यामधून आपण वाट काढत या जुव्यात पोहोचतो.



अर्थात या बेटावर पोहोचण्यासाठी असलेला एकमेव मार्ग म्हणजे बोट.

याबेटावरची लोकसंख्या आहे अवघी 77 त्यातील 71 जणच मतदार. गावचे तब्बल सात सदस्य आणि सरपंच या केवळ 71 लोकातूनच निवडले जातात. पण गेल्या 47 वर्षात या गावाने निवडणूकच अनुभवलेली नाही.

पण मग या गावचा गाडा चालतो तरी कसा?

तर त्याचं उत्तर म्हणजे गाव एकत्र बसतो आणि चर्चेने सगळ्यांना निवडून देतो .



या बेटावर शाळा आहे... दोन मुलं... आणि एक मास्तर... पण त्या दोन मुलांच्या शिक्षणासाठी मास्तर रोजच्या रोज बोटीनं येतात... या बेटावर मतदानही होत नाही... मदतानासाठी खाडी ओलांडून जावं लागतं...

या गावात 77 माणसं असली... तरी घरं मात्र 107... पण बहुतांश बंद... वर्षातून गणपती आणि शिमग्याला मात्र गजबजतात... तशी या गावामध्ये कोणतीच समस्या नाही... पण एक समस्या मात्र या गावाच्या विकासाच्या आड येतेय... आणि तो म्हणजे... नसलेला रस्ता



खारलँड बंधारा बांधून या बेटाला जोडण्याचा प्रयत्न झाला, पण हे सरकारी काम गेल्या ३५ वर्षात कधीच पूर्ण झालेले नाही . निधी खर्ची पडतो पण रस्ता पूर्ण होत नाही. पाण्यात अर्धवट घातलेल्या आणि वाहून गेलेल्या खुणा आजही दिसतात.

इतक्या प्रतिकूल स्थितीतही या बेटाला जागतं ठेवलं आहे, ते या पाण्यानं.  सभोवताला खारं पाणी असतानाही... या बेटावर गोड्या पाण्याच्या विहिरी आहेत... पण या गावाला आणखी एक गोष्ट खास बनवते. तो म्हणजे या बेटाचा इतिहास.



छत्रपतींच्या काळापासून हे बेट अस्तित्वात होतं आणि त्याच काळात पहिल्यांदा या बेटाचा वापर झाला असल्याचे सांगितले जाते. संभाजी राजांना मोघलांनी संगमेश्वरमध्ये घेरले असताना, ताराबाईंना सुरक्षितपणे याच बेटावर ठेवण्यात आले. इथूनच या बेटाचा वावर सुरु झाला. याचवेळी हे बेट मालोजी खोत शिंदे यांच्या ताब्यात देण्यात आलं, असं इथले गावकरी सांगतात.

काय नाही या बेटावर... निसर्ग... आहे... इतिहास... आहे... दुर्गमता... आहे... खाद्यसंस्कृती... आहे... असं असतानाही... हे बेट उपेक्षित आहे..

शांतता अनुभवायची असेल... तर इथं या... माणसांच्या गोंगाटापासून... वाहनांच्या वेगापासून... आणि भौतिक सुखाच्या खुळचट कल्पनांपासून दूर असलेल्या या बेटाच्या तुम्ही प्रेमात पडाल.