अहमदनगर: 'उद्धव ठाकरेंनी मला गांडुळाची उपमा दिली. पण गांडूळ हा शेतकऱ्यांचा मित्र असतो. पण स्वत:ला शेषनाग म्हणवून घेणारे उद्धव ठाकरे तर कालिया नाग आहेत.' अशा शब्दात विरोधी पक्षनेते राधाकृष्ण विखे-पाटील यांनी उद्धव ठाकरेंवर टीका केली आहे.


शिवसेनेच्या मुखपत्रात माझ्यावर खालच्या पातळीवर टीका केली. मी मात्र केव्हाही व्यक्तिगत पातळीवर टिका केली नाही. त्यांनी मला गांडूळ म्हटलं पण गांडूळ शेतकऱ्याचा मित्र आहे. उद्धव ठाकरे स्वत:ला शेषनाग म्हणवून घेतात. पण सत्तेत आल्यापासून लाचारी पत्करून हा शेषनाग बिळात का जातो? हा शेषनाग नसून कालिया आहे. असा हल्लाबोल विखे-पाटलांनी केला उद्धव ठाकरेंवर केला आहे.

'दसरा मेळाव्याला शिवसैनिक पाठ फिरवतील असं मी म्हटल्यांनी त्यांनी माझ्यावर टीका केली. ते शेषनाग नसून कालिया आहेत आणि माझ्या नावातही कृष्ण आहे. हे त्यांनी लक्षात ठेवावं.' असा थेट हल्ला विखे-पाटलांनी केला आहे.

'शेतकऱ्यांना कर्जमाफी करावी'

मराठवाड्यात मोठ्या प्रमाणात पुरानं थैमान घातलं आहे. अशा परिस्थितीत सरकारनं तात्काळ अन्नछत्र सुरु करावं. शेतीचं नुकसान झालं आहे त्यामुळे शेतकऱ्यांना त्वरीत अर्थिक मदत आणि कर्जमाफी करावी.

'आरक्षणाबाबत मुख्यमंत्र्यांनी वेळकाढूपणा करु नये'

मागण्यांसाठी प्रत्येकजण मोर्चा काढण्याचा अधिकार आहे. मराठा समाज कोणाच्या ओबीसी आरक्षणावर अतिक्रमण करणार नाही. घटनेच्या चौकटीत आरक्षण मागतो आहोत, त्यामुळे सरकारनं आपली भूमिका स्पष्ट करावी. मुख्यमंत्र्यांनी वेळकाढूपणा करु नये. त्वरित कायद्यात आवश्यक ती दुरुस्ती करुन आरक्षण द्यावं. अशी मागणी विखे-पाटलांनी केला आहे.