मराठवाड्यात सोयाबीन, तूर, कापूस अशा पिकांचं 100 टक्के नुकसान झालं आहे. त्यामुळे ओला दुष्काळ जाहीर करण्याची मागणी मुंडे यांनी केली आहे, ते नाशकात बोलत होते.
काँग्रेस नेते राधाकृष्ण विखे-पाटील यांनी मराठवाड्यातील शेतकऱ्यांच्या कर्जमाफीची मागणी केली आहे. शेतकऱ्यांना आर्थिक मदतीसह अन्नछत्रांचीही सोय करावी असं विखेंनी म्हटलं आहे.
मराठवाड्यात गेल्या अनेक दिवसांपासून झालेल्या तुफान पावसानं दुष्काळ धुऊन निघाला, तरी शेतीचं मात्र मोठं नुकसान झालं आहे. या महाप्रलयाने तब्बल 16 लाख हेक्टर शेतं पाण्याखाली गेल्यानं शेतकऱ्यांचं मोठं नुकसान झालं आहे.
मराठवाड्यातल्या 16 लाख हेक्टर क्षेत्रावरच्या शेतजमिनीवर अद्यापही पाणी साचलं आहे. पावसाचा सर्वाधिक फटका सोयाबीनला बसला आहे. अनेक ठिकाणी सोयाबीनला कोंब फुटल्याने शेतकऱ्यांच्या हाताशी आलेलं पिक वाया गेलं आहे. या नुकसानीचे जिल्हाधिकाऱ्यांनी तात्काळ पंचनामे करण्याचे आदेश दिले आहेत.