मुंबई : ‘कोकणातील नाणार प्रकल्पाविरोधात सुरु असलेले शिवसेनेचे आंदोलन म्हणजे भाजपशी केलेल्या एका ‘डिल’चा भाग असून, हे भाजप-शिवसेनेचे ‘मॅच फिक्सिंग’ आहे.’ अशी  टीका विधानसभेतील विरोधी पक्षनेते राधाकृष्ण विखे पाटील यांनी केली आहे.


‘मुळात केंद्र सरकारला नाणारचा प्रकल्प गुजरातला पळवायचा आहे. परंतु, हा प्रकल्प आपल्या काळात गुजरातमध्ये गेल्याचे पाप माथी यायला नको म्हणून भाजपने शिवसेनेला हाताशी धरले आहे. दोन्ही पक्षांच्या संगनमताने ठरलेल्या रणनितीनुसार शिवसेनेने प्रकल्पाला विरोध करायचा आणि भाजपने सुरुवातीला या प्रकल्पाची रदबदली करुन काही काळाने जनमताचा आदर करीत असल्याची सबब सांगायची आणि हा प्रकल्प रद्द करायचा.’ असा आरोप विखे पाटील यांनी केला.

‘या प्रकरणामध्ये भाजप-शिवसेना दोघेही मिळून जनतेला मूर्ख बनवू पाहत आहेत. एकीकडे शिवसेनेचे उद्योग मंत्री विधानसभेत हा प्रकल्प रद्द केल्याचे सांगतात. तर दुसरीकडे भाजपचे केंद्र सरकार या प्रकल्पाला विविध प्रकारच्या मान्यता देते.’ असं म्हणत विखे-पाटलांनी शिवसेना आणि भाजपवर निशाणा साधला.

दरम्यान, नाणार प्रकल्पला केंद्र सरकारने मान्यता दिल्यानंतर शिवसेनेनं मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्यासह भाजपवर जोरदार टीका केली होती. ‘कणाहीन मुख्यमंत्र्यांना नाणार प्रकल्प लादू देणार नाही.’ अशा शब्दात शिवसेना पक्षप्रमुख उद्धव ठाकरेंनी भाजपला विरोध केला होता.

संबंधित बातम्या :

मनसेने नाणार प्रकल्पासाठी काम करणारं कार्यालय फोडलं

कोकणात नाणार प्रकल्प होणार नाही म्हणजे नाही : राज ठाकरे

...तर मनसे नाणारवासियांसाठी रस्त्यावर उतरेल!


कणाहीन मुख्यमंत्र्यांना नाणार प्रकल्प लादू देणार नाही : उद्धव ठाकरे