अहमदनगर : नामांकित मेडिकल कॉलेजला प्रवेश मिळवून देण्याच्या बहाण्याने लुटणाऱ्या परप्रांतीय टोळीचा भांडाफोड करण्यात आला आहे. लातूर जिल्ह्यातील तीन विद्यार्थ्यांना फसवणूक करताना पाच जणांची टोळी जेरबंद करण्यात आली.

अहमदनगरमध्ये गोवा, उत्तर प्रदेश, दिल्ली आणि नवी मुंबई अशा विविध ठिकाणच्या पाच जणांच्या मुसक्या आवळल्या आहेत. यामुळे देशातील या रॅकेटचा पर्दाफाश होण्यास मदत होणार आहे.

या टोळीतील कुणी प्राचार्य, तर कुणी प्राध्यापक बनून विद्यार्थ्यांना गंडा घालत होते. यासाठी या भामट्यांनी नामी शक्कल लढवून बनावट ओळखपत्र, बनावट शिक्के, फॉर्म आणि लेटरपॅडही छापलं होतं. मात्र लातूरच्या तीन विद्यार्थ्यांना गंडा घालताना त्यांचा भांडाफोड झाला.

कसा झाला भांडाफोड?

वैद्यकीय विद्यार्थ्यांना गंडवणाऱ्या या टोळीतील पाचही जण वेगवेगळ्या राज्यातील आहे. यातील अमीत सिंग हा गोव्याचा, राहुल शर्मा उत्तर प्रदेशचा, राहुल कुमार दुबे दिल्लीचा, संदीप गुप्ता मुंबईचा, तर कौशिक तिवारी हा फरिदाबादचा आहे. हे सर्व जण हायटेक पद्धतीने विद्यार्थ्यांचा प्रवेशाचा ऑनलाईन डेटा चोरुन त्यांच्याशी संपर्क साधून फसवणूक करत होते.

लातूरच्या तीन पोस्ट ग्रॅज्युएशनच्या विद्यार्थ्यांची माहिती घेऊन भामट्यांनी सापळा रचला. प्रत्येकी साडे वीस लाखात वैद्यकीय अभ्यासक्रमाला प्रवेश मिळवून देण्याची बतावणी केली. त्यानंतर दोघांकडून साडे दहा लाख रुपये उकळले. मात्र आपली फसवणूक झाल्याचं लक्षात आल्यावर सबंधितांनी पोलीस अधीक्षकांकडे तक्रार केली. त्यानंतर पोलिसांनी छापा टाकून टोळीला जेरबंद केलं. कोर्टाने भामट्यांना आठ दिवसांची पोलीस कोठडी सुनावली आहे.

'शॉर्टकट' टाळा

एमबीबीएसनंतर पदव्युत्तर अभ्यासक्रमासाठी (पीजी) ‘नीट’ची परीक्षा असते. यातील गुणांवर पीजी कोर्सला प्रवेश मिळतो. ऑल इंडिया रॅकिंग काढून पारदर्शक प्रवेश दिला जातो. मात्र काही विद्यार्थ्यांना कमी गुण मिळाल्यावर ते मॅनेजमेंट कोट्याचा आधार घेण्याचा प्रयत्न करतात. या शॉर्टकटच्या नादात पालक आणि विद्यार्थी फसत असल्याचं जाणकार सांगतात.

देशव्यापी रॅकेट?

भामट्यांकडून बनावट कागदपत्रे, कारसह दहा लाखांचा मुद्देमाल जप्त करण्यात आला आहे. या भामट्यांनी देशभरात अनेक ठिकाणी विद्यार्थ्यांना गंडा घातल्याची शक्यता आहे. भामट्यांना स्थानिक कोणाचं पाठबळ आहे का, याबाबतचाही तपास सुरु आहे. त्याचबरोबर पोलीस या टोळीच्या म्होरक्याचा तपास करत आहेत.