Sharad Pawar faction : शरद पवार यांनी रायगड डोलीतून सर करत पक्षाला मिळालेल्या 'तुतारी' चिन्हाचे अनावरण केले. शरद पवार तब्बल 40 वर्षांनी रायगडावर पोहोचल्याने महायुतीमधील नेत्यांनी खोचक शब्दात प्रतिक्रिया दिली. उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी अजित पवारांना क्रेडिट द्यावं लागेल, अशी प्रतिक्रिया दिली. यानंतर आता शरद पवार गटाकडून जोरदार प्रत्युत्तर देण्यात आलं आहे. राष्ट्रवादी काँग्रेस पक्ष शरदचंद्र पवार पक्षाच्या महिला सरचिटणीस भावना घाणेकर यांनी शरद पवार 40 वर्षांनी रायगडावर गेल्याने ट्रोल करणाऱ्यांनी आरबी समुद्रातील छत्रपती शिवाजी महाराज यांच्या स्मारकाच काय झालं याचं उत्तर द्यावं? असा सवाल केला आहे. विशेष म्हणजे अरबी समुद्रातील भव्य स्मारकाचे भूमिपूजन पीएम मोदी यांच्या हस्ते करण्यात आले होते.


सरकारने प्रत्येक वर्षी रायगडावर जाऊन काय केलं?


भावना घाणेकर म्हणाल्या की, मागील अनेक वर्षांपासून छत्रपती शिवाजी महाराज यांच्या अरबी समुद्रातील स्मारकाचे काम झालेलं नाही. रायगड किल्ला ते पाचाड जवळपास 21 किलोमीटर रस्त्याचं काम 800 कोटी मंजूर होऊन देखील अद्याप पूर्ण झालेलं नाही. रायगडावरील छत्रपती शिवाजी महाराज यांच्या पुतळ्याच्या चौथऱ्याची दुरावस्था झाली आहे. याकडे दुर्लक्ष करणाऱ्या सरकारने प्रत्येक वर्षी रायगडावर जाऊन काय केलं याचे उत्तर द्यावं. शरद पवार यांनी अंबाबाईच्या मंदिरासाठी आठ कोटी रुपये मंजूर करून ते काम पूर्ण केलं होतं. राज्यातील अनेक मंदिरांचा जीर्णोद्धार करण्याचे काम शरद पवार यांनी केलं. त्यामुळे शरद पवार चाळीस वर्षांनी गडावर गेले हे ट्रोल करत बसण्यापेक्षा त्यांनी केलेले काम ट्रोल करणाऱ्यांनी पहावं, असा टोला त्यांनी लगावला. 


तुतारी एका संघर्षाची सुरुवात करण्याची प्रेरणा देणारी 


दरम्यान, शरद पवार यांनी तुतारी चिन्हाचे अवतरण केल्यानंतर मार्गदर्शन केले. ते म्हणाले की, आज महाराष्ट्राची जी स्थिती आहे ती जर बदलायची असेल तर पुन्हा एकदा या ठिकाणी जनतेचे राज्य येईल यासाठी कष्ट करावे लागण्याचा हा कालखंड आहे. त्यासाठी आज राष्ट्रवादी काँग्रेस पक्ष-शरदचंद्र पवार या नावाने ही संघटना आपण सर्वांनी उभी केली ती मजबूत करायची आणि त्यासाठी आज निवडणूक आयोगाने आपल्याला आपला परिचय लोकांच्यात व्हावा यासाठी एक रणशिंग फुंकलेलं आहे व तुतारी दिलेली आहे. 


ते पुढे म्हणाले की, ही तुतारी एका संघर्षाची सुरुवात करण्याची प्रेरणा देणारी आहे. माझी खात्री आहे की ही प्रेरणा दिल्यानंतर तुम्हा सगळ्यांच्या कष्टातून, शौर्यातून, त्यागातून ही यश मालिका या ठिकाणी मिळेल. हे यश पुन्हा एकदा महाराष्ट्राच्या जनतेसमोर आनंदाची तुतारीची रणशिंग फुंकण्याची स्थिती या राज्यात लवकरच तुमच्या कष्टाने, प्रयत्नाने आणि सामान्य माणसाच्या शक्तीने येईल याची मला खात्री आहे. म्हणून आज या ऐतिहासिक भूमीमध्ये, शिवछत्रपतींचं राज्य जिथून चाललं गेलं, तिथे आज आपण आलेलो आहोत. इथून आपण प्रेरणा घेऊ व छत्रपतींचा जो आदर्श होता तो नजरेसमोर ठेवून राज्य उभे करू, जनतेची सेवा करू एवढेच या ठिकाणी सांगतो. या नव्या चिन्हाचे स्वागत अंत:करणापासून करून मी तुम्हा सर्वांना धन्यवाद देतो. 


इतर महत्वाच्या बातम्या