सिंधुदुर्ग : कोकणात गौरी गणपती सणाच्या निमित्ताने येणाऱ्या चाकरमानी लोकांचा क्वारंटाईन कालावधी चौदा दिवसावरून सात दिवस करावा, असे निर्देश पालकमंत्री उदय सामंत यांनी जिल्हा शांतता समितीच्या बैठकीत दिले आहेत. तर खासदार विनायक राऊत यांनी गणेश भक्तांच्या भाविकांना तडा जाणार नाही अशी कोविड नियमावली असावी असे सुचविले.


सिंधुदुर्ग जिल्हा दक्षता शांतता समितीची बैठक सिंधुदुर्गमध्ये झाली. पालकमंत्री उदय सामंत यांनी अधिकाऱ्यांच्या उपस्थितीत झालेल्या बैठकीचे इतिवृत्त ग्राह्य धरता येणार नाही ते रद्द झाले असे समजा असे निर्देश जिल्हाधिकारी यांना दिले. गणेश चतुर्थी सणात येणाऱ्या गणेशभक्तांना सुलभ पद्धतीने ई पास मिळवता यावेत, त्यांच्या आरोग्याची तपासणी करावी, येण्यासाठी बस सुविधा करावी, महामार्गावर टोल फ्री योजना आखावी आणि मुंबई गोवा महामार्ग योग्य तिथे दुरुस्ती करावी याबाबत मुख्यमंत्री, सार्वजनिक बांधकाम, मुख्य सचिव यांच्याशी चर्चा करून भूमिका ठरविली जाईल असे पालकमंत्री सामंत यांनी या बैठकीत सांगितले.

गौरी-गणपती सणाच्या काळात किती लोकांना आगमन,भजन, प्रतिष्ठापणा व विसर्जन करताना सहभागी होता येईल, याबाबत योग्य ती भूमिका घेऊन शिफारस करायला हवी. गणपती सणाच्या निमित्ताने पारंपारिक भजन, आरती आपण थांबू शकत नाहीत, त्यामुळे त्याबाबत निर्णय घेताना गणेश भक्तांचा गैरसमज वाढणार नाही याकडे लक्ष दिले जाणार आहे.

रत्नागिरी व सिंधुदुर्ग जिल्ह्यात या सण आनंदात साजरा केला जातो. त्यामागची पारंपरिकता आणि लोकांचा सहभाग विचारात घेऊन योग्य ते निर्णय करायला हवे, आम्ही मुख्यमंत्री उद्धव ठाकरे व राज्याचे मुख्य सचिव यांच्याशी चर्चा करून नियमात शिथिलता करावी म्हणून आग्रही राहू असे खासदार विनायक राऊत बैठकीत बोलले.