सोलापूर : सोलापूर जिल्ह्यातील आकुंभे गावात वृक्षांच्या संवर्धनासाठी एक अभिनव संकल्पना राबविण्यात आली आहे. ही संकल्पना गावातील झेडपी शाळेच्या शिक्षकाच्या डोक्यातूनआली आहे. गावातील जुन्या झाडांची कत्तल होऊ नये याकरिता त्या झाडांवर QR कोड टॅग लावण्यात आले. जेणेकरून ते झाड तोडण्याचा प्रयत्न केला असता रेड अलर्ट मेसेज मुलांच्या मोबाईलवर जात आहे. या अनोख्या प्रयोगासाठी जिल्हा परिषदेचे शिक्षक असलेल्या रणजितसिंह डिसले या गुरुजींचा आंतरराष्ट्रीय पातळीवर सन्मान झाला आहे. नव्या तंत्रज्ञानचा फायदा गाव, शाळा आणि विद्यार्थ्यांच्या विकासासाठी कसा करून घ्यावा, याचे आदर्श उदाहरण डिसले यांच्या रूपाने समोर आले आहे.
सोलापूर जिल्हा परिषदेचे शिक्षक रणजितसिंह डिसले यांना या संकल्पनेसाठी अमेरिकास्थित नॅशनल जियोग्राफिकचा पुरस्कार यांना अमेरिकास्थित नॅशनल जिओग्राफिक सोसायटीच्या वतीने दिला जाणारा नॅशनल जिओग्राफिक 'इनोव्हेटिव्ह एज्युकेटर' हा पुरस्कार जाहीर झाला आहे. नॅशनल जिओग्राफिक सोसायटीची एक्सप्लोलर फेलोशिप, प्रमाणपत्र व सन्मानचिन्ह असे या पुरस्काराचे स्वरूप आहे.
डिसले गुरुजींनी राबवला 'अराउंड द वर्ल्ड' प्रोजेक्ट
जैवविविधता व पर्यावरण संरक्षण याकरिता तंत्रज्ञान वापरून जगभरातील मुलांमध्ये पर्यावरण संरक्षणविषयक जाणीव जागृती निर्माण केल्याबद्दल हा पुरस्कार जाहीर झाला आहे. जगातील 28 देशांतील 90 शिक्षकांना हा पुरस्कार जाहीर झाला आहे. भारतातील 3 जणांना हा पुरस्कार मिळाला आहे. डिसले गुरुजींनी राबवलेल्या 'अराउंड द वर्ल्ड' या प्रोजेक्टकरता त्यांना हा पुरस्कार मिळाला आहे. यामध्ये आकुंभे गावातील झेडपीच्या शाळेची निवड करण्यात आली होती. याअंतर्गत गावाचे Environment रिपोर्ट कार्ड तयार करून पर्यावरणदृष्टीने अधिक समृद्धता आणण्यासाठी व्यापक कृती कार्यक्रम राबवला गेला. गावातील एकूण झाडांची संख्या, गावाचे एकूण क्षेत्रफळ, दुचाकी व चारचाकी वाहनांची संख्या आदी माहिती संकलित करून 33% वन क्षेत्र निर्माण करण्यासाठी तंत्रज्ञान वापरण्यात आले.
जिल्हा परिषदेचे प्रयोगशील शिक्षक रणजितसिंह डिसले
झाड तोडण्याचा प्रयत्न केल्यास रेड अलर्ट मुलांच्या मोबाईलवर
गावातील जुन्या झाडांची कत्तल होऊ नये याकरिता त्या झाडांवर QR कोड टॅग लावण्यात आले आहेत. ते झाड तोडण्याचा प्रयत्न केला असता रेड अलर्ट मेसेज मुलांच्या मोबाईलवर जात आहे. गावातील मुलं अशा झाडाचा शोध घेऊन त्या झाड तोडणाऱ्या व्यक्तीला 5 रोपे देतात. या कृती कार्यक्रमामुळे गावातील 26 % असणारे वन क्षेत्र मागील 5 वर्षांत 33% वर पोहचले आहे. उपक्रमाच्या माध्यमातून पाठ्यपुस्तकातील ज्ञान दैनंदिन जीवनातील समस्या सोडवण्यासाठी वापरण्यात मुलांनी विशेष कल दाखवला आहे.
मागील वर्षी सदर उपक्रम व्यापक स्वरूपात रावबला गेला असून यामध्ये रशिया, इटली व फिनलँड मधील शाळांनी सहभाग नोंदवला आहे.
संयुक्त राष्ट्राच्या Teach SDG सदिच्छादूत निवड
संयुक्त राष्ट्राने निर्धारित केलेली शाश्वत विकासाची उद्दिष्टे साध्य करण्यासाठी केलेल्या प्रयत्नांची दखल घेऊन रणजितसिंह डिसले यांची सदिच्छादूत म्हणून निवड करण्यात आली आहे. डिसले यांनी राबवलेल्या अराउंड द वर्ड, लेट्स क्रॉस द बॉर्डर्स यासारख्या शैक्षणिक उपक्रमाची दखल घेऊन 2030 पर्यंत शास्वत विकासाची उद्दिष्टे साध्य करण्यासाठी प्रसार व प्रचार करण्याच्या हेतूने डिसले यांची सदिच्छादूत म्हणून निवड केली आहे. भारतातील निरु मित्तल, विनिता गर्ग, बनीता बेहरा, कविता संघवी,आयुष चोप्रा यांचीही सदिच्छादूत म्हणून निवड झाली आहे.
वृक्षसंवर्धनासाठी QR कोड, झेडपीच्या गुरुजींना नॅशनल जियोग्राफिकचा पुरस्कार
एबीपी माझा वेब टीम
Updated at:
16 Dec 2018 03:55 PM (IST)
संयुक्त राष्ट्राने निर्धारित केलेली शाश्वत विकासाची उद्दिष्टे साध्य करण्यासाठी केलेल्या प्रयत्नांची दखल घेऊन रणजितसिंह डिसले यांची सदिच्छादूत म्हणून निवड करण्यात आली आहे.
- - - - - - - - - Advertisement - - - - - - - - -