नाशिक : सध्याच्या आर्थिक मंदीची झळ ऑटोमोबाईल क्षेत्राला सर्वाधिक बसताना दिसत आहे. नाशिक आणि पुण्यातील औद्योगिक वसाहतीला याचा फटका बसू लागला आहे. नाशिकच्या औद्योगिक क्षेत्रातील अग्रेसर असणाऱ्या बॉश कंपनीचं उत्पादन पुढील आठ दिवस बंद राहणार आहे. तर पिंपरीतील टाटा मोटर्समध्येही आठ दिवस ब्लॉक क्लोजर घेण्यात येणार आहे. त्यामुळे कामगारांची चिंता वाढला आहे.


हजारो कामगारांना फटका


डिझेल गाड्यांमधील इंजेक्टर आणि नोझल बॉश कंपनीत तयार केले जातात. मात्र डिझेलच्या गाड्यांचा मागणीअभावी खप कमी झाल्याने वाहनाचे उत्पादन थंडावले आहे. त्याचा परिणाम बॉश कंपनीच्या उत्पादनावर होऊ लागला आहे. कंपनीचं उत्पादन घटलं आहे. तसेच बॉश कंपनीवर आधारित इतर लघू उद्योजकांनाही याचा फटका बसत आहे. अशारीतीने 10 ते 12 हजार कामगारांना आर्थिक मंदीचा फटक बसण्याची शक्यता वर्तवली जात आहे. पिंपरीतील टाटा मोटर्सने देखील 28 ते 31 ऑगस्ट असे चार दिवस आणि 3 ते 6 सप्टेंबर असे चार दिवस मिळून आठ दिवसांचा ब्लॉक क्लोजर जाहीर केला आहे.



महिंद्रा अँड महिंद्रा पाठोपाठ बॉश, टाटा कंपनीही मंदीच्या फेऱ्यात अडकल्याने कामगारांना सणासुदीच्या काळात अनेक समस्यांचा सामना करावा लागणार आहे. नाशिकच्या औद्योगिक वसाहतीमध्ये महिंद्रा अँड महिंद्रा आणि बॉश या दोन मोठ्या कंपन्या आहेत. मात्र या कंपन्याच अडचणीत येणे ही धोक्याची घंटा मानली जात आहे. हजारो कामगारांचा रोजगार यामुळे संकटात सापडला आहे.


कंपनीच्या 50 वर्षाच्या काळात कंपनी बंद करावी, अशी परिस्थिती कधीही निर्माण झाली नव्हती. गेल्या काही महिन्यापासून ऑटोमोबाईल क्षेत्र मंदीचा सामना करत आहे. वाहन निर्मितीत असणाऱ्या मोठ्या कंपन्यांचं उत्पादन निम्म्याहून खाली आलं आहे. ऑटोमोबाईल इंडस्ट्रीचे धोरणे सरकारकडून योग्य पद्धतीने ठरवली न गेल्याने आणि सरकारच्या उदासीनतेमुळे ही वेळ आज आली असल्याचा आरोप बॉश कंपनीच्या कामगार युनियनचे उपाध्यक्ष सागर देशमाने यांनी केला आहे.